Kangana Ranaut : शेतकऱ्यांवर कंगना असं काय बोलली? की भाजपनेच केला विरोध!

BJP objection on Kangana statement : शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौतला भाजपने तंबी दिली आहे. काय म्हणाली होती कंगना?

सौरभ तळेकर | Updated: Aug 26, 2024, 05:21 PM IST
Kangana Ranaut : शेतकऱ्यांवर कंगना असं काय बोलली? की भाजपनेच केला विरोध! title=
BJP objection on Kangana statement

BJP Slam Kangana ranaut : हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रणौतने केलेलं वादग्रस्त वक्तव्य भाजपला भोवलं आहे. कंगनाने एका मुलाखतीदरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आणि कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर भाजपवर पुन्हा टीका होऊ लागली होती. अशातच आता भाजपने अधिकृत निवेदन जारी करून कंगनाने केलेल्या टिप्पणीवर आक्षेप नोदंवला अन् कंगनाला तंबी दिली आहे. 

भाजपच्या प्रेस नोटमध्ये काय म्हटलंय?

भाजप खासदार कंगना राणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. कंगना राणौत यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाने असहमती व्यक्त केली आहे. पक्षाच्या वतीने, कंगना रणौत यांना पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर विधाने करण्याची परवानगी किंवा अधिकृतता नाही, असं भाजपने स्पष्टपणे सांगितलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंगना राणौत यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्ष 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' आणि सामाजिक समरसता या तत्त्वांचे पालन करण्याचा निर्धार आहे, असंही भाजपने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे. 

कंगना नेमकी काय म्हटली होती?

जर आमचे नेतृत्व मजबूत नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबचे बांगलादेशात रूपांतर झालं असतं. केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने कृषी विधेयक मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला होता असा दावाही कंगनाने केलाय. कधी विचारही केला नव्हता की विधेयक मागे घेतलं जाईल. फार मोठी प्लॅनिंग होती. अगदी बंगलादेशसारखी... यामागे चीन, अमेरिकेसारख्या परकीय शक्ती येथे काम करत आहेत, असं कंगना म्हणाली होती.