"हे खपवून घेतले जाणार नाही"; विमानातील धुम्रपानाचा Video व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया

सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Updated: Aug 11, 2022, 06:03 PM IST
"हे खपवून घेतले जाणार नाही"; विमानातील धुम्रपानाचा Video व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया title=

दिल्ली :  सोशल मीडिया स्टार बॉबी कटारियाचा (bobby kataria) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी कटारिया विमानामध्ये सिगारेट ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉबी कटारियाच्या सहकाऱ्याने काढला आहे. हा व्हिडीओ आधी बॉबी कटारियाच्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर करण्यात आला होता. नंतर हा व्हिडिओ त्याच्या अकाऊंटवरुन हटवण्यात आला. मात्र, तोपर्यंत तो व्हायरल झाला होता.

बॉबी कटारियाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल नागरी उड्डाण सुरक्षा विभागाने घेतली आहे. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत एएनआयला सांगितले की, "बॉबी कटारियाने 23 जानेवारी रोजी स्पाईसजेटच्या (SpiceJet) विमानाने दुबई ते नवी दिल्ली प्रवास केला होता. हा व्हिडिओ आता त्याच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर उपलब्ध नाही."

शिवाय, यापूर्वी विमान सुरक्षा व्यवस्थेकडून कारवाई करण्यात आली होती. नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने एएनआयला विमानात धुम्रपान करताना एका व्यक्तीच्या व्हायरल व्हिडिओवर उल्लेख केला होता. विमानामध्ये धुम्रपान करताना एका व्यक्तीच्या व्हायरल व्हिडिओबद्दल विचारले असता नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Aviation Minister Jyotiraditya Scindia) म्हणाले की, याची चौकशी केली जात आहे. अशी वागणूक खपवून घेतली जाणार नाही.

स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एक प्रवासी विमानात धूम्रपान करताना दिसत आहे. जानेवारी 2022 मध्ये जेव्हा हा व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आणि विमान कंपनीने गुरुग्राममधील उद्योग विहार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तपासाअंती हा व्हिडिओ 20 जानेवारी 2022 रोजी शूट करण्यात आल्याचे समोर आले. दुबईहून दिल्लीला जाणाऱ्या एसजी 706 या विमानामध्ये हा प्रकार घडला होता.

 कोण आहे बॉबी कटारिया?

बॉबी कटारिया मूळचा हरियाणातील गुरुग्रामचा आहे. बॉबी कटारिया 2017 मध्ये अचानक प्रकाशझोतात आला होता. त्याने गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये पोलिसांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. तो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन थेट पोलिसांना धमक्या देत असे. त्यानंतर बॉबी कटारियावर गुरुग्राम आणि फरीदाबादमध्येही गुन्हे दाखल झाले आणि त्यांना तुरुंगातही जावे लागले.

पोलिसांविरुद्ध मोहिम उघडल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला आणि फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल साइट्सवर त्याचे लाखात फॉलोअर्स आहेत. बॉबीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही हरियाणवी आणि बॉलीवूड कलाकारांसोबत रील बनवून पोस्ट देखील केले आहेत.