मुंबई : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा प्रत्येक पक्ष विविध मार्गांचा अवलंब करत त्यांच्या परिने पक्षाचा प्रचार करण्याला प्राधान्य देत आहे. एकिकडे ‘चौकीदार चोर है’ असं म्हणत राहुल गांधी आणि काँग्रेसकडून नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. पण, त्याच मोहिमेला उत्तर देत आणि चर्चेत असणाऱ्या ‘चौकीदार’चा अंदाज घेत भाजपाकडून ‘मै भी चौकीदार हूँ’, ही मोहिम राबवण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेच बोल असणाऱ्या गाण्याचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केला आणि त्यानंतर भाजपच्या बड्या नेतेमंडळींनी सोशल मीडियावर त्यांच्या अकाऊंटच्या हँडलमध्ये ‘चौकीदार’ची जोड दिली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनीही ‘मै भी चौकीदार’, या मोहिमेला पाठिंबा देत एक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, अकबर यांनी ट्विट करताच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मात्र त्यांच्यावर तोफ डागल्याचं पाहायला मिळालं.
‘तुम्हीही चौकीदार आहात तर, मग महिला सुरक्षित नाहीत’, असं थेट शब्दांत म्हणत त्यांनी अकबर यांच्याव निशाणा साधला. एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आल्याची बाब हेरत, असे चौकीदार असतील तर मात्र महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे, अशा आशयाचं ट्विट करत शहाणे यांनी सर्वांचच लक्ष वेधलं. त्यामुळे ‘मै भी चौकीदार’या मोहिमेला एक वेगळं वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपाकडून राबवण्यात आलेल्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेला पाठिंबा देत माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी एक ट्विट केलं होतं. ‘मै भी चौकीदार हूँ या मोहिमेत सहभागी होण्याच्या मला आनंदच होत आहे. भारत देशावर प्रेम करणाऱा एक नागरिक म्हणून मी, भ्रष्टाचार, गरिबी, अस्वच्छता, दहशतवाद या गोष्टींशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील असेन आणि एका कणखर, सुरक्षित आणि वैभवसंपन्न असा भारत साकारण्यास हातभार लावेन’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.