मुंबई : लग्न करतेवेळी उत्सवमूर्ती, अर्थात नवरदेव किंवा नवरीबाईचे एक ना अनेक हट्ट असतात. जीवनात अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभ्या असणाऱ्या या मंडळींना स्वत:पुढे गगन ठेंगणं वाटतं. मग ही मंडळी काय करतील याचा अनेकदा नेम नसतो. (Wedding Video)
अशाच एका अफलातून आणि दमदार तरुणीचा तिच्याच लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोक्यावर पदर ठेवून, मोठ्यांसमोर तोंडाला कुलूप लावून, सतत लाजत राहून सर्वांसमोर नवरीमुलीनं येण्याचे दिवस गेले आता; अशीच प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी दिली आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवरी मुलगी हातात असणाऱ्या ग्लासमधील पेयाचा एक घोट घेत पुढे जे म्हणतेय ते ऐकून अनेकजण थक्कच होत आहेत. माणसानं इतकं दिलखुलास असावं, अशा प्रतिक्रियाही काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
आपल्या एका इशाऱ्यावर वोडका क्रॅनबेरी आणा, असं ती कोणालातरी सांगताना दिसत आहे. बरं, वोडका ऐवजी ज्यूस आणला आहे असं सांगण्याचा इशाराही ती देताना दिसत आहे. हे सांगत असताना तिचा अंदाज सर्वांच्याच चेहऱ्यावर नकळतच हसू आणत आहे. स्वत:च्या लग्नसोहळ्याचा मनमुराद आनंद घेणारी अशी कोणती नवरी तुम्हाला भेटलीये का?