बीटेक करायचंय पण इंग्रजी येतेय आड? काळजी करु नका; 'या' IIT ने घेतलाय मोठा निर्णय

BTech In Hindi : 

Pravin Dabholkar | Updated: Jul 10, 2024, 03:46 PM IST
बीटेक करायचंय पण इंग्रजी येतेय आड? काळजी करु नका; 'या' IIT ने घेतलाय मोठा निर्णय title=
IIT Btech In Hindi

BTech In Hindi : मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन आयआयटी, इंजिनीअरिंग, एमबीबीएस असे व्यावसायिक कोर्स करताना अडचणी येतात. दरम्यान इंजिनीअरिंग आणि एमबीबीएसचे शिक्षण हिंदी भाषेत करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. हिंदी शाळांमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर बीटेकमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना खूप संघर्ष करावा लागतो. पण आता बीटेक करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

भाषेचा अडसर असेल तर तुम्हाला हिंदी माध्यमातही बीटेक करता येणार आहे. IIT जोधपूरने विद्यार्थ्यांना ही आनंदाची वार्ता दिली आहे. त्यांनी हिंदी माध्यमात B.Tech पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वर्ग सुरू होण्यापूर्वी हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील लेक्चर्स निवडण्याचा पर्याय दिला जाणार आहे. यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकणार आहेत. 

दोन्ही भाषांमध्ये एकच शिक्षक शिकवणार आहेत. सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना भाषेचे माध्यम बदलण्याचा पर्याय असणार आहे. असे असले तरी  माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना कोणता भेदभाव केला जाणार नाही. दोन्ही भाषेत शिकणाऱ्यांना समान पातळीवर गुण दिले जाणार आहेत..

शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती 

शिक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. IIT जोधपूरमध्ये हिंदी माध्यमात B.Tech अभ्यासक्रम सुरू झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील गावखेड्यात राहणारे विद्यार्थी आयआयटी जोधपूरमध्ये शिक्षणासाठी येतात. हिंदी भाषेत शिक्षण झालेले असल्याने त्यांना इंग्रजीतून बीटेक करणे अवघड जाते. त्यांचा आत्मविश्वास ढासळतो. हे पाहता आयआयटी जोधपूरने हा निर्णय घेतलाय. 

आयआयटी जोधपूर आता या शैक्षणिक सत्रापासून इंग्रजीसह हिंदीमध्ये बीटेक कोर्स शिकवला जाणार आहे. हे सांगताना आम्हाल खूप आनंद होतोय. हा उपक्रम सर्व विद्यार्थी त्यांना सर्वात सोयीस्कर असलेल्या भाषेत प्रभावीपणे शिकू शकतील अशा पद्धतीने डिझाइन केलाय, अशी माहिती आयआयटी जोधपूरने दिली आहे. 

शिक्षणात सातत्य आणि गुणवत्ता राखण्यासाठी, एकच प्रशिक्षक दोन्ही विभागांना शिकवणार आहे. आयआयटी जोधपूरमध्ये अधिक समावेशक आणि आश्वासक शैक्षणिक वातावरणाचा प्रचार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असेही पुढे म्हटले आहे. 

गेल्या महिन्यातच मिळाली होती मान्यता 

IIT जोधपूरच्या सिनेटने 26 जून रोजी झालेल्या 38 व्या बैठकीत आणि 28 जून रोजी झालेल्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या बैठकीत बी.टेक अभ्यासक्रम हिंदी माध्यमात सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे हिंदी मिडियमच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी काही वर्षांपूर्वी आयआयटी संस्थांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रम हिंदीतून सुरू करण्यास विरोध केला होता. त्यामुळे या निर्णयास विलंब झाला.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा