नवी दिल्ली : अर्थ मंत्री पियूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षातून प्रतिक्रीया येण्यास सुरूवात झाली आहे. या अर्थसंकल्पात सरकारने अपेक्षेप्रमाणे शेतकरी, लहान व्यापारी, नोकरदार आणि गरीब वर्गाला सर्वतोपरी खूश करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून हे सर्व घटक आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवतील असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त केला जात आहे. अर्थसंकल्प संपल्यावर लगेचच विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलेल्या अर्थसंकल्पाची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अर्थसंकल्प सादर होत असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पडलेल्या चेहऱ्यावरुनही माध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली. दरम्यान मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राहुल यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
Dear NoMo,
5 years of your incompetence and arrogance has destroyed the lives of our farmers.
Giving them Rs. 17 a day is an insult to everything they stand and work for. #AakhriJumlaBudget
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2019
मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून राग व्यक्त केला. तुमच्या घमेंडीने भरलेल्या पाच वर्षांनी आमच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. शेतकऱ्यांना केवळ 17 रुपये प्रतिदिन देऊन त्यांचा अपमान केला आहे, असे ट्वीट त्यांनी केले.
पीयूष गोयल यांनी अत्यंत संयत आणि नेमकेपणाने मांडलेला हा अर्थसंकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. तब्बल पावणेदोन तासांच्या भाषणात गोयल यांनी यूपीए सरकारच्या तुलनेत मोदी सरकारचे यश अगदी मुद्देसूदपणे अधोरेखित केले. शेतकरी, सामान्य करदाते, असंघटित कामगार आणि गरीब वर्गासाठी करण्यात आलेल्या प्रत्येक महत्त्वपूर्ण घोषणेचे सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवून स्वागत केले.