Budget 2019: बजेटमध्ये महिलांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

महिलांसाठी निर्मला सीतारमण यांनी खुशखबर दिली आहे.

शैलेश मुसळे | Updated: Jul 5, 2019, 06:16 PM IST
Budget 2019: बजेटमध्ये महिलांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट title=

नवी दिल्ली : देशातील पहिल्या पूर्णकालीन स्वतंत्र कारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला बजेट आज सादर केला. आपल्या बजेटमध्ये निर्मला सीतारमण यांनी सगळ्या वर्गाचा विचार केला आहे. महिलांसाठी निर्मला सीतारमण यांनी खुशखबर दिली आहे. निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही.

'नारी तू नारायणी' म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जनधन खाते असलेल्या महिलांसाठी ५००० रुपयांची ओवरड्राफ्ट सुविधेची घोषणा केली आहे. सोबतच महिलांसाठी एक लाख रुपयाच्या मुद्रा लोनची व्यवस्था करण्यात येईल असं देखील म्हटलं आहे.

महिलांना काय फायदा?

२०१४ मध्ये मोदी सरकारने जनधन योजनेच्या अंतर्गत बँक खाती उघडण्याचं काम केलं होतं. ज्या महिलांचं जनधन खातं आहे. त्यांच्या खात्यात एकही पैसा नसेल तरीही त्यांना ५००० रुपये काढता येतील. आतापर्यंत महिलांना आपल्या जनधन खात्यातून फक्त २ हजार रुपये काढता येत होते. पण आता ५ हजार रुपये काढता येणार आहेत. यालाच ओवरड्राफ्ट सुविधा म्हटलं आहे.

दुसरीकडे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील मुद्रा योजनेचा लाभ देखील महिलांना घेता येणार आहे. मोदी सरकारच्या या मुद्रा योजनेतून निर्मला सीतारमण यांनी महिलांना १ लाख रुपयांचं लोन उपलब्ध करुन दिलं आहे.