आधी बॉर्नविटा, आता नेस्ले...भारतातील मुलांशी होतोय भेदभाव? बेबी प्रोडक्ट्सवरुन वाद

Nestle Baby Products : लहान मुलांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेली नेस्ले कंपनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. कंपन्यांवर नजर ठेवणाऱ्या वेबसाईट 'पब्लिक आय' च्या तपासात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 

राजीव कासले | Updated: Apr 18, 2024, 05:26 PM IST
आधी बॉर्नविटा, आता नेस्ले...भारतातील मुलांशी होतोय भेदभाव?  बेबी प्रोडक्ट्सवरुन वाद title=

Nestle: 2 मिनिटात बनणाऱ्या मॅगीची जाहीरात करणारी स्वित्झर्लंडची दिग्गज कंपनी 'नेस्ले' पुन्हा एकदा वादात अडकली आहे. 2015 मध्ये मॅगीत (Maggi) अतिरिक्त मोनोसोडियम ग्लूटामेट आढळून आलं रोतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा नेस्ले (Nestle) कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. स्वित्झर्लंडमधल्या कंपन्यांवर नजर ठेवणारी वेबसाईट 'पब्लिक आय' ने आपल्या तपासात धक्कादायक खुलासे केले आहेत. तपासात नेस्ले कंपनीकडून भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्ट्समध्ये (Baby Products) प्रमाणापेक्षा जास्त साखरेचा वापर केला जात असल्याचं उघड झालं आहे. 

पण युरोप आणि ब्रिटनमध्ये विकल्या जाणाऱ्या नेस्ले कंपनीच्या याच बेबी प्रोडक्टमध्ये जराही साखर नसल्याचं अहवालात नमुद करण्यात आलं आहे. यामुळे कंपनी भारतातील मुलांबरोबर भेदभाव करतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. असं आढळल्यास कंपनीच्या समस्येत वाढ होऊ शकते. FSSAI तपासणीत कंपनी दोषी आढळल्यास तिच्यावर कारवाई होऊ शकते.

भारतीय मुलांबरोबर भेदभाव
नेस्ले कंपनीच्या भारतात विकल्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्ट्समध्ये विशेषत: दूध आणि सेरेलॅकमध्ये अतिरिक्त साखरेचा वापर केला जात आहे. नेस्लेच्या या बेजबाबदारपणामुळए लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका वाढत आहे. नेस्ले आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत करून भारतासह गरीब आणि विकसनशील देशांमध्ये साखर असलेली उत्पादने विकत आहे. पण ब्रिटेन, युरोप आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या त्यांच्या कोणत्याही प्रोडक्टमध्ये साखरेचा वापर केला जात नाही.

आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये नेस्लेच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश झाला आहे. दुचप्पीपणामुळे नेस्ले भारतीय मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे. 

गरीब देशांतील प्रोडक्ट्समध्ये साखर का?
'पब्लिक आय'च्या अहवालातून नेस्ले कंपनीची पोलखोल करण्यात आली आहे. गरीब देशातील मुलांच्या प्रोडक्टस्मध्ये कंपनीकडून जास्त साखरेचा वापर केला जातो. तर विकसीत देशातील मुलांच्या प्रोडक्ट्समध्ये साखर वापरली जात नाही. धक्कादायक म्हणजे कंपनीने आपल्या प्रोडक्ट्सवर याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही. बेबी प्रोडक्ट्समध्ये किती प्रमाणात विटामिन, मिनेरल्स आहेत याची माहिती छापली जाते. पण यात किती प्रमाणात साखर आहे याची माहिती दिली जात नाही. 

कंपनीच्या या दुटप्पी वृत्तीमुळे भारतासहीत त्या देशांतील मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय, ज्या देशात नेस्लेची प्रोडक्ट्स विकली जात आहेत. भारात विकल्या जाणाऱ्या नेस्लेच्या सेरेलॅकमध्ये 3 ते 4 ग्रॅम साखर असते. तर स्वित्झर्लंड, ब्रिटन, युरोप सारख्या देशांमध्ये याच प्रोडक्टमध्ये साशरेची मात्रा शुन्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार 3 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांच्या जेवणात साखरेचं प्रमाण जास्त असल्यास त्यांच्यात लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, पांढऱ्या रक्त पेशी कमकुवत होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि दातात पोकळ्या निर्माण होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

नेस्ले कंपनीचं स्पष्टीकरण
पब्लिक आयचा हा अहवाल आल्यानंतर नेस्ले कंपनीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नेस्लेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार बेबी फूड हायली कंट्रोल्ड श्रेणीत येतं. कंपनी ज्या देशात काम करते तिथल्या स्थानिक कायदे आणि आंतरराष्ट्रीय मानकांचं पालन केलं जातं.  कंपनीच्या उत्पादनांची 'गुणवत्ता, सुरक्षितता आणि चव' यांच्याशी तडजोड न केली जाणार नाही. आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की लहान मुलांच्या खाद्यपदार्थात प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, खनिज, लोह इत्यादी पोषण आहारासाठी आवश्यक असणाऱ्या नियमांची पूर्तता केली जाते. आम्ही आमच्या उत्पादनांच्या पौष्टिक गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाही आणि कधीही तडजोड करणार नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.