ICICI कर्ज : व्हिडिओकॉन आणि दीपक कोचर यांच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे

व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि दीपक कोचर यांची कंपनी नूपावर यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Jan 24, 2019, 12:33 PM IST
ICICI कर्ज : व्हिडिओकॉन आणि दीपक कोचर यांच्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे title=

नवी दिल्ली - खासगी क्षेत्रातील मोठ्या आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याशी संबंधित कर्ज प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी सीबीआयने मुंबई आणि औरंगाबादमध्ये व्हिडिओकॉनच्या मुख्यालयांमध्ये छापे टाकले आहेत. या संपूर्ण प्रकरणात चंदा कोचर यांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद राहिली आहे. व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि दीपक कोचर यांची कंपनी नूपावर यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर एकूण चार ठिकाणी सीबीआयचे पथक दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरिमन पॉईंट येथील व्हिडिओकॉनचे कार्यालय त्याचबरोबर नूपावरच्या कार्यालयामध्ये छापे टाकण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?
आयसीआयसीआय बॅंक आणि व्हिडिओकॉनचे समभागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बॅंक आणि सेबीला पत्र लिहून व्हिडिओकॉनचे वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांनी एकमेकांना फायदा करून दिल्याचा आरोप केला होता. आयसीआयसीआय बॅंकेकडून व्हिडिओकॉनला ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले. त्याबदल्यात धूत यांनी दीपक कोचर यांच्या नूपावर कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केली. चंदा कोचर यांनी आपल्या पतीच्या कंपनीसाठी वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉनला कर्ज मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला. २०१८ मध्ये हे प्रकरण उजेडात आल्यानंतर चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला होता. सीबीआयने फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल सादर केला होता. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर छापे टाकण्यात आले आहेत. या सर्व घटनांमुळे आगामी काळात चंदा कोचर यांच्या कुटुंबापुढील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.