लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र!

नाझीर अहमद हे भारतीय सैन्यात २००४ साली प्रादेशिक सैन्याच्या १६२ व्या तुकडीत दाखल झाले.

Updated: Jan 24, 2019, 12:08 PM IST
लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र! title=

श्रीनगर : दहशतवाद्यांच्या विरोधात गतवर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात दक्षिण काश्मिरच्या शोपियां भागात लढताना वीरमरण आलेल्या लान्सनायक नाझीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र देण्यात येणार आहे. अशोक चक्र हा सैन्य दलाकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान असतो. प्रजासत्ताक दिनी हा सन्मान दिला जाणार आहे. 

लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांनी अतिरेक्यांना कंठस्नान घालून, आपल्या जखमी सहकाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढून मदत केली होती. भारतीय सैन्यदलातील लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांचे हे सर्वोच्च बलिदान आहे, असे राष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.
 
विशेष बाब अशी की, शहीद लान्स नायक नाझीर अहमद वाणी हे सैन्यात येण्याआधी दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होते. पण त्यांनी देशसेवा करण्याच्या उद्देशाने सैन्यदलात रुजू होण्याचे ठरवले. सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्याच्या कार्यात सहभाग घेतला.
 
नाझीर अहमद हे भारतीय सैन्यात २००४ साली प्रादेशिक सैन्याच्या १६२ व्या तुकडीत दाखल झाले. गतवर्षाच्या नोव्हेंबरमध्ये लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांनी काश्मिरच्या काही भागांमध्ये दहशतवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी कारवाई केली होती. मुळचे कुलगामचे असलेले लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना दोन वेळा सेना पदक मिळाले आहे.
 
लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांनी सुरक्षा दलांविरोधात झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शोपियाच्या  रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारावेळी त्यांना वीरमरण आले. नझीर अहमद वाणी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि दोन मुले आहेत.