कोरोना लॉकडाऊनमध्ये सीबीएसईची परीक्षांबाबत मोठी घोषणा

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

Updated: May 27, 2020, 08:45 PM IST
कोरोना लॉकडाऊनमध्ये सीबीएसईची परीक्षांबाबत मोठी घोषणा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनामुळे १०वी १२वीचे अनेक विद्यार्थी आपल्या घरच्या जिल्ह्यांमध्ये किंवा आपल्या स्वत:च्या राज्यात गेले आहेत. असे विद्यार्थी त्यांची परीक्षा आपल्याच जिल्ह्यामध्ये देऊ शकतील, यासाठी सीबीएसई प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. 

'कोरोनामुळे हजारो मुलं आपल्या गृहराज्यात गेली आहेत. अशा परिस्थितीत बोर्डाची परीक्षा देण्यासाठी या विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) विद्यार्थी त्यांच्याच जिल्ह्यातून परीक्षा देऊ शकतील, असा निर्णय घेतला आहे,' असं रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.

विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी बोर्डाने आधी दिलेल्या केंद्रावर यायची गरज नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणी करण्याबाबतची माहिती सीबीएसई लवकरच देईल, असं मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सांगितलं. 

विद्यार्थी सध्या कुठे आहेत आणि ते कुठून आपली परीक्षा देतील, हे त्यांनी शाळांना सांगावं. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा घ्यायचा सीबीएसईचा प्रयत्न आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल. त्यावेळीच त्यांना परीक्षा कुठे द्यायची हेदेखील समजेल, असं वक्तव्य रमेश पोखरियाल यांनी केलं. 

कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे शाळा बंद करण्यात आल्या, यानंतर २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, त्यामुळे परीक्षाही थांबवण्यात आल्या. आता ही परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान होईल. १२वीची राहिलेल्या विषयांची परीक्षा संपूर्ण देशात होईल, तर १०वीची राहिलेल्या विषयांची परीक्षा फक्त उत्तर पूर्व दिल्लीमध्ये होणार आहे.

राज्यात शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं उत्तर