पर्रिकरांच्या निधनानंतर केंद्राकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर

१९९४ मध्ये पर्रिकर पणजीमधून आमदार झाले.

Updated: Mar 17, 2019, 09:37 PM IST
पर्रिकरांच्या निधनानंतर केंद्राकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर title=

नवी दिल्ली: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी देशभरात दुखवटा पाळला जाईल. या काळात दिल्लीसह इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. तसेच पर्रिकर यांच्यावर उद्या गोव्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.  
 
गोव्यातील म्हापशात १३ डिसेंबर १९५५ ला मनोहर पर्रिकर यांचा जन्म झाला होता. मुंबई आयआयटीमधून पर्रिकर इंजिनिअर झाले. शालेय जीवनापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सक्रिय होते. १९९४ मध्ये पर्रिकर पणजीमधून आमदार झाले. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मोदी सरकारमध्ये देशाचे संरक्षणमंत्री झाले. या काळात संरक्षण क्षेत्रासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री असतानाच भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. 

काही महिन्यांपूर्वी मनोहर पर्रिकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर ते उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. उपचार घेऊन भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली होती. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार पाहायला मिळाले होते. परंतु तरीही पर्रिकर यांनी नेटाने आपले काम सुरु ठेवले होते.