Brother Dies By Geyser Gas: गिझरमुळे 2 सख्ख्या भावांचा बळी! बाथरुममधील दृष्य पाहून आई किंचाळली अन्...

two brother dies due to geyser gas: आई लग्नाची तयारी करत असतानाच मुलं केस कापून आल्यानंतर अंघोळीसाठी गेली त्यावेळी हा विचित्र अपघात झाला

Updated: Feb 6, 2023, 06:59 PM IST
Brother Dies By Geyser Gas: गिझरमुळे 2 सख्ख्या भावांचा बळी! बाथरुममधील दृष्य पाहून आई किंचाळली अन्... title=
Two Brother Dies Due To Geyser Gas

Two Brother Dies Due To Geyser Gas: हरियाणामधील हिसार (Hisar) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा आंघोळ करताना मृत्यू झाला आहे. हे दोन्ही भाऊ मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिसारमधील नागौरी गेटजवळच्या तिलक श्यामवाली गल्ली येथे ही घटना घडली. 13 वर्षीय माधव आणि 9 वर्षीय सोहम गीझरचा गॅस (Geyser Gas) लीक झाल्याने घरातील बाथरुममध्ये गुदमरुन मृत्यू झाला. दोन्ही भाऊ हेअर कटिंग करुन एकत्र अंघोळीसाठी गेले होते.

आई करत होती लग्नाला जाण्याची तयारी

गॅस गीझर बाथरुममध्ये लावण्यात आला होता. ही दोन्ही मुले आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली आणि कडी लावून आंघोळ करत होते. बराच वेळ ते बाहेर आले नाही तेव्हा धक्का देऊन दरवाजा उघडला असता दोन्ही मुलं बेशुद्धावस्थेत आढळून आले. दोन्ही मुलं मूळची गुरुग्रामची राहणारी आहेत. ते आपल्या काकाच्या लग्नाला जाण्यासाठी तयार होते होते. या मुलांची आई सुद्धा लग्नाला जाण्यासाठी तयार होत असतानाच ही दुर्घटना घडली.

खिडक्या होत्या बंद

नातेवाईकांनी दिलेल्या वृत्तानुसार 13 वर्षीय माधव आणि 9 वर्षीय सोहम रविवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारस घराशेजारच्या सलूनमधून हेअरकट करुन आले होते. हेअरकट करुन घरी आल्यानंतर माधवला त्याच्या आईने पटकन आंघोळ करुन येण्यास सांगितलं. त्याचवेळी सोहमही आंघोळ करुन आला. दोघांनी एकाच वेळी आंघोळीला जाण्याचं ठरवलं. थोड्यावेळाने दोघेही आंघोळीला गेले. बाथरुमच्या खिडक्या बंद होत्या.

वॉशरुमच्या फटीमधून पाहिलं अन्...

मुलांनी कडी लावून आंघोळ करायला सुरुवात केली. जवळजवळ 10 मिनिटांनी या मुलांची आई हिमानी या दोन्ही मुलांना बाथरुममधून बाहेर येण्यासाठी आवाज देऊ लागल्या. मात्र दोघांकडून कोणताही प्रतिसाद मिळाली नाही. हिमानी यांनी वॉशरुममध्ये असलेल्या उंचावरील फटीमधून पाहिलं असता आतमध्ये दोघेही बेशुद्धावस्थेत पडल्याच दिसलं. हिमानी यांनी मोठ्याने आरडाओरड सुरु केला. हा गोंधळ ऐकून इतर नातेवाईकांनी रुममध्ये धाव घेतली. दोघांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी दोन्ही भावांना दाखल करण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडल्याचं घोषित केलं.

अपघाती मृत्यूची नोंद

या मुलांचे वडील सौरभ हे शहरामध्ये एक फोटोग्राफी लॅब चालवतात. दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर घरातील लग्नाचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. सौरभ यांचं कुटुंब गुरुग्राममध्ये राहतं. संपूर्ण कुटुंब सौरभच्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी तयार होत असतानाच हा प्रकार घडला. माहिती मिळाल्यानंतर सिटी पोलीस स्थानकातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन अपघाती मृत्यूची नोंद केली. पोस्टमॉर्टम न करताच दोघांवर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस स्थानकाचे प्रमुख कप्तान सिंह यांनी गॅसमुळे गुदमरुन या मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं.