चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करत भारताने संपूर्ण जगभरात आपली मान उंचावली आहे. इस्त्रोने चांद्रयान 3 ला चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर लँडिंग केल्यानंतर पुढील 14 दिवस वेगवेगळी निरीक्षणं करण्यात आली. जगात कोणत्याही देशाला चंद्राच्या या भागावर उतरता आलं नसल्याने भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. यासह भारताच्या हाती अनेक नवे नमुने, फोटो लागले असून त्यांचा अभ्यास केला जात आहे. दरम्यान, 14 दिवसानंतर रात्र झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांना डिअॅक्टिव्हेट करण्यात आलं होतं. यानंतर सूर्यादय झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा झोपेतून उठवण्याचा म्हणजेच रिलाँच करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण इस्त्रोला कोणतंही यश मिळत नाही आहे.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कुंभकर्णाच्या झोपेत असून अजिबात उठण्याच्या तयारीत नाहीत. 20 सप्टेंबर 2023 ला त्यांचा लँडिग पॉईंट म्हणजे शिवशक्ती पॉईंटवर सूर्योदय झाला आहे. सूर्याचा प्रकाशही तिथे पोहोचला आहे. पण विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही असं दिसत आहे.
22 सप्टेंबर 2023 पासून इस्त्रोची टीम वारंवार विक्रम लँडरला संदेश पाठवत आहे. पुढील आणखी दिवस हे संदेश पाठवले जाणार आहेत. चंद्रावर जोवर सूर्यास्त होणार नाही, तोपर्यंत पुन्हा रात्र होत नाही. पण सध्याच्या घडामोडी पाहता चांद्रयान 3 ची यशस्वीपणे सांगता झाल्याचं दिसत आहे.
इस्रोने यशस्वीपणे विक्रमचं लँडिग केलं होतं. तेव्हापासून प्रज्ञान रोव्हरने 105 मीटपर्यंत प्रवास केला. विक्रम लँडरने उडी मारुनही दाखवलं होतं. दरम्यान, अभ्यासात चंद्राच्या पृष्ठभागावर आवश्यक गॅस आणि खनिजं असल्याचं स्पष्ट झालं आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.
याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनाच चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणं जमलं आहे. जेव्हा रात्र होऊ लागली होती तेव्हा इस्रोच्या वैज्ञानिकांनी विक्रम आणि प्रज्ञान यांना झोपवलं होतं. झोपण्याआधी त्यांची बॅटरी फुल चार्ज होती. प्रज्ञानचे सोलार पॅनल्स सूर्याच्या दिशेला होते. जेणेकरुन सूर्योदय झाल्यानंतर प्रकाश थेट सोलार पॅनल्सवर पडेल. सूर्याचा योग्य प्रकाश मिळाल्यानंतर ते पुन्हा जागे म्हणजेच अॅक्टिव्ह होतील अशी अपेक्षा होती.
महत्त्वाचं म्हणजे, विक्रम आणि प्रज्ञानला फक्त 14-15 दिवसांच्या मोहिमेसाठीच तयार करण्यात आलं होतं, जे पूर्ण झालं आहे. त्यापेक्षाही जास्त वेळ त्यांनी चंद्रावर घालवला आहे. त्यामुळेच जर त्यांना जाग आली तर हा एक वैज्ञानिक चमत्कारच असेल. पण असं होणं आता कठीण दिसत आहे. कारण उणे 120 ते 240 डिग्री सेल्सिअसमध्ये यंत्राचे सर्किट उडण्याचा धोका असते.