छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान जखमी

गुरुवारीही कांकेर भागात जवानांची एक टीम सर्च ऑपरेशनवर असताना अचानक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता

Updated: Apr 5, 2019, 08:55 AM IST
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान जखमी title=
फाईल फोटो

रायपूर : छत्तीसगडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडून आलीय. धमतरी भागात शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांच्या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झालेत. या चकमकीत नक्षलवाद्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय. यापूर्वी गुरुवारी कांकेर भारात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले होते तर दोन जवान जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गुरुवारीही कांकेर भागात जवानांची एक टीम सर्च ऑपरेशनवर असताना अचानक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पखांजूरच्या प्रतापपूर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम मौलाच्या जंगलात ही चकमक झाली. घटनेची सूचना मिळाल्यानंतर अतिरिक्त ताफा पाठवण्यात आला. गुरुवारी दुपारी ११.४५ वाजल्याच्या सुमारास ही चकमक झाली. नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या ११४ व्या बटालियनला निशाण्यावर घेतलं. या चकमकीत अनेक नक्षलवादीही जखमी झाल्याचं समजतंय. 

नक्षलवाद्यांकडून याआधीही सामान्य नागरिक आणि जवानांना टार्गेट करण्यात आलंय. यापूर्वी होळीच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी बाजापूरमध्ये नागरिकांना लक्ष्य केलं होतं. यावेळी आयईडी स्फोट घडवून एका वाहनाला उडवून देण्यात आलं. या घटनेत जवळपास ९ जण जखमी झाले होते. १८ मार्च रोजीही दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट करून जवानांवर हल्ला केला होता. या घटनेत एक जवान शहीद झाला होता.