छगन भुजबळांचा एक निर्णय महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?

छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकवंलं खरं, पण आता पुढं काय करायचं या अडचणीत सापडले आहेत. 

शिवराज यादव | Updated: Dec 21, 2024, 08:43 PM IST
छगन भुजबळांचा एक निर्णय महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?

छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकवंलं खरं, पण आता पुढं काय करायचं या अडचणीत सापडले आहेत. मोठा राजकीय निर्णय घ्यायचा तर आहे. पण ठोस पर्याय सापडत नसल्यानं भुजबळ आता आहिस्ते कदम पुढं सरकू लागलेत. मुंबईत ओबीसी नेत्यांशी चर्चा करुन भुजबळ मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झालीय आहे.

Add Zee News as a Preferred Source

छगन भुजबळांनी नाशिकच्या समता परिषदेच्या मेळाव्यातून अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीकेचे बाण सोडले. आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचला, अजित पवारांवर मनमानीचा आरोपही केला. भुजबळांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची सगळी तयारी केली. राष्ट्रवादी सोडली तर पुढं काय याचं प्लॅन बी भुजबळांकडं दिसत नाही. त्यामुळंच भुजबळांच्या आक्रमकतेतली धार अचानक कमी झाली आहे. भुजबळांनी आता मौन धारण केलं असून ठोस पर्याय निवडल्यानंतरच भुजबळ आपली पुढची वाटचाल जाहीर करतील. पुढच्या वाटचालीबाबत भुजबळांनी नाशिकच्या सभेत आपल्या स्टाईलनं सांगितलं होतं.

कोणतेही ठोस पर्याय दिसत नसल्यानं आता भुजबळ राष्ट्रवादीकडून कोणी समजूत काढण्यासाठी येतो का त्याची वाट पाहत बसल्याचं सांगण्यात येतंय. सध्या त्यांच्यासमोर तीन राजकीय पर्याय आहेत. 

भुजबळांनी ओबीसींसाठी वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणे

छगन भुजबळांनी भाजपसोबत जाणे

राष्ट्रवादी आणि अजित पवारांशी जुळवून घेत आहे तिथंच थांबणे असे तीन पर्याय असल्याचं सांगण्यात येतंय.

भुजबळांनी अजित पवारांवर मनमानीचे आरोप केल्यानंतर आता अजित पवार भुजबळांची समजूत काढण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. अशावेळी भुजबळ स्वतः कोंडी फोडण्यासाठी काय करणार याकडं सगळ्या समर्थकांचं लक्ष लागलंय.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More