"दोन्ही देश सीमावर्ती भागात..."; तवांग संघर्षावर अखेर चीनने सोडलं मौन

Tawang clash : अरुणाचल प्रदेशातील (arunachal pradesh) तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये (India China Clash) जोरदार चकमक झाली होती. मात्र चीनने  याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती

Updated: Dec 25, 2022, 06:11 PM IST
"दोन्ही देश सीमावर्ती भागात..."; तवांग संघर्षावर अखेर चीनने सोडलं मौन title=
(फोटो सौजन्य - PTI)

Tawang clash : अरुणाचल प्रदेशातील (arunachal pradesh) तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये (India China Clash) जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे भारतीय सैनिकांपेक्षा चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिली होती. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी संसदेत बोलताना याबाबत माहिती दिली होती.

आमच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक - अमित शाह

दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत बोलताना कॉंग्रेसवर टीका केली होती. तसेच भारतीय सैन्याचेही कौतुक केले होते. "भारताच्या एक इंच जमिनीवर कोणीही ताबा मिळवलेला नाही आणि असे कोणी करुही शकत नाही. 8 डिसेंबरच्या रात्री आणि 9 डिसेंबरच्या सकाळी आपल्या सैनिकांनी भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर काढले. आमच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मी कौतुक करतो," असे अमित शाह म्हणाले होते.

हे ही वाचा >> तवांगवर ताबा मिळवण्यासाठी चीन का प्रयत्न करतय?

पहिल्यांदाच चीनने दिली प्रतिक्रिया

तवांगमधील या घटनेनंतर चीनने आता पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी चीन आणि भारत परस्पर संबंध स्थिर आणि मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास तयार आहेत, असे म्हटले आहे. 25 डिसेंबर रोजी वांग यांनी चिनी माध्यमांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही एकत्र काम करण्यास तयार

"चीन आणि भारताने राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून संवाद कायम ठेवला आहे. दोन्ही देश सीमावर्ती भागात स्थिरता राखण्यासाठी कटिबद्ध आहेत. परस्पर संबंध दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास तयार आहोत," असे वांग यांनी म्हटले आहे. 9 डिसेंबर रोजी तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पहिल्यांदाच याबाबत भाष्य केले आहे.

"भारत आणि चीनमध्ये 20 डिसेंबर रोजी चुशुल-मोल्डो सीमेवर चीनच्या बाजूने कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची 17 वी फेरी झाली. यामध्ये दोन्ही देशांनी सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यास सहमती दर्शवली," अशी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या चकमकीनंतर दिली होती.

चिनी सैनिकांनी अतिक्रमण करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला होता. मात्र भारतीय लष्कराने त्याला विरोध केला आणि त्यानंतर चकमक झाली. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली होती. मात्र या चकमकीत किती सैनिक जखमी झाले याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही.