मुंबई : जगभरात ख्रिसमस दरम्यान गिफ्ट आणि केकचं किती महत्व असतं हे आपण सर्वांनाच माहिती आहे. पण त्यासोबतच आणखी एका गोष्टीला खास महत्व असतं ती म्हणजे ख्रिसमस ट्री.
तुम्हाला कदाचित कधीतरी प्रश्न पडला असेल की, ख्रिसमसला हे झाड का सजवलं जातं. तर त्या प्रश्नाचं उत्तरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे एक एव्हरग्रीन झाड आहे. या झाडांची कोणत्याच ऋतूमध्ये पानगळ होत नाही. नेहमीच ताज्या राहणा-या या पानांना ख्रिश्चन लोक प्रभू येशू प्रमाणे मानतात. चला जाणून घेऊया या झाडाबाबत काही खास गोष्टी.....
असे मानले जाते की, संत बोनिफेस हे इंग्लंड सोडून जर्मनीत गेले. येथील लोकांना प्रभू येशू ख्रिस्तांचा संदेश देणे होता. दरम्यान त्यांनी पाहिले की, काही लोक देवाला प्रसन्न करण्यासाठी ओक झाडाखाली एका लहान बालकाचा बळी देत होते. रागावलेल्या संत बोनिफेसने ते ओक झाड कापून टाकलं आणि त्या जागी एक नवीन झाड लावलं. या झाडाला संत बोनिफेसने प्रभु येशूच्या जन्माचं प्रतिक मानलं आणि अनुयायांनी या झाडाला मेणबत्त्यांनी सजवलं. तेव्हापासून ख्रिसमसला ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू झाली.
असे मानले जाते की, बेल्जियम, नार्वे, स्वीडन आणि हॉलंड या यूरोपियन देशांमध्ये भूतं पळवण्यासाठी ख्रिसमस ट्रीच्या फांद्यांचा वापर केला जातो. अशी मान्यता तयार झाली होती की, या झाडाच्या फांद्या लावल्याने भूत-प्रेत येत नाहीत. आज जगभरात ख्रिसमस ट्री लावणे अनिवार्य परंपरा बनली आहे. जर खरं झाड मिळालं नाही तर नकली प्लॅस्टीकचं झाड घरांमध्ये सजवलं जातं.
ख्रिसमस ट्री सजवण्याच्या परंपरेची सुरूवात जर्मनीतून झाल्याचे मानले जाते. या झाडाला निरंतर जीवनाचं प्रतिक सुद्धा मानलं जातं. कारण हे झाड वर्षानुवर्षे जगतं. साधारण २ हजार वर्षांपासून ख्रिसमस ट्री सजवलं जात असल्याचं बोललं जातं. जर्मनीतून ही परंपरा इंग्लंडमध्ये आली आणि तेथून जगभरात ही परंपरा पसरली. अमेरिकेत ही परंपरा जर्मनीच्या अप्रवाशी लोकांनी सुरू केली होती.
ख्रिसमस ट्री इंग्लंडमध्ये लोकांच्या जन्मदिवसानिमित्त, लग्नानिमित्त किंवा एखाद्याचा मृत्यु झाल्यावर त्याच्या आठवणीतही लावलं जातं. ते लावून पृथ्वी नेहमी ताजीतवाणी रहावी अशीही प्रार्थना केली जाते.
ख्रिसमस ट्रीवर इलेक्ट्रिक लाईट लावण्याचा विचार १८८२ मध्ये थॉमस एडिसनचे सहायक एडवर्ड जॉनसन यांच्या डोक्यात आला होता. वर्ष १८९० मध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिसमस ट्री लाईट्स खरेदी केले गेले होते. काही इतिहासकारांचं समज आहे की, झगमगत्या ख्रिसमस ट्रीचा संबंध मार्टिन लूथरसोबत होता. त्यांनी सर्वातआधी १६व्या शतकात छोट्या ख्रिसमस ट्रीमध्ये मेणबत्ती लावली जेणेकरून जंगलात तारे भासावे.