नवी दिल्ली : जम्मू काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारठला आहे. काश्मीरमध्ये उणे तापमान आहे. शून्य अंशाच्या खाली तापमान गेल्यानं गारठा वाढला आहे. श्रीनगरमध्ये या मौसमातलं सर्वात कमी तापमान काल रात्री नोंदंवलं गेलं. उणे पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानं दललेकही बर्फाच्छादित झालं आहे. दललेकच्या किनाऱ्यावर तब्बल दोन इंचाचा बर्फाचा थर तयार झाला आहे. इतकंच नाही तर पाइपलाईन्समधलं ही पाणी गोठलंय. कडाक्याच्या थंडीमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग आणि मुगल रोडही बंद आहे. आग्रा येथेही थंडीनं कहर केला आहे. आज सकाळी आग्रा येथे धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना वाहनं अत्यंत धीम्या गतीनं चालवावी लागत आहेत. आग्रा येथे धुक्यासह थंड हवा वाहत असल्याने थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.
देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडी आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. २८ आणि २९ डिसेंबरला आणखी थंडी वाढण्य़ाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच धुक्यांचं प्रमाण वाढणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
दिल्ली, नोएडासह अनेक भागात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीत थंडीने रेकॉर्ड मोडला आहे. दिल्लीत बुधवारी पारा ५.४ अशांवर घसरला होता. १९९७ नंतर पहिल्यांदा पारा इतक्या खाली गेला आहे. येत्या २ दिवसात पारा ४ अशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे थंडी आणखी वाढणार हे निश्चित.