उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय

उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय. काल रात्री राजधानी दिल्लीत यंदाचं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. पारा 4.2 अंशांवर घसरलाय.  

Updated: Jan 10, 2018, 12:10 PM IST
उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय title=

नवी दिल्ली : उत्तर भारतात कडक्याच्या थंडीनं परिसीमा ओलांडलीय. काल रात्री राजधानी दिल्लीत यंदाचं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं. पारा 4.2 अंशांवर घसरलाय.  

फटका रेल्वे वाहतूकीला

हवामान खात्यानं पुढचा किमान आठवडाभर थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवलाय. कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतूकीला बसलाय. मंगळवारी संध्याकाळी उत्तर भारतातल्या विविध मार्गावरच्या 22 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर बहुतांश रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलंय. 

दल सरोवर गोठलंय

काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये पारा उणे 6.2 पर्यंत घसरल्यानं शहरातील पर्यटनाचं मुख्य स्थान असणारं दल सरोवर गोठलंय. तिकडे हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पिटी खोऱ्यांमध्ये तापमान उणे 20 अशांपर्यंत खाली गेलंय. उत्तर प्रदेशातल्या मेरठ शहरात 2.9 अंश सेल्शियस तापमानाची नोंद करण्यात आली. 

पंजाब आणि हरयाणातही कमालीची थंडी

पंजाब आणि हरयाणातही कमालीची थंडी पडली असून राजधानी चंदीगडमध्ये पारा 3.4 अंश सेल्शियस तापमानाची नोंद झालीय. राजस्थानाच्या मैदानी भागातही थंडीचा कहर झालाय. अलवरमध्ये 0.3, सिकरमध्ये 1.5 तर माऊंट अबू आणि चुरू या थंड हवेच्या ठिकाणांवर तापमान 2.2 अंशांवर जाऊन ठेपलंय.