नवी दिल्ली : भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी केंद्रात होऊ घातलेल्या काँग्रेसच्या महाआघाडीला लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. छत्तीसगडपाठोपाठ मध्य प्रदेशातही काँग्रेस आणि बसपात आघाडी होण्याची चिन्ह नाहीत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सपाने काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात काँग्रेस काय निर्णय घेतो, याची उत्सुकता आहे.
मायावतींनी मध्य प्रदेशात ५० जागांची मागणी केली आहे. काँग्रेसनं मात्र एवढ्या जागा देण्यास असमर्थता दर्शवलीय. त्यामुळे महाआघाडी होण्यापूर्वीच मतभेद निर्माण झाले आहेत. बसपा आणि काँग्रेस जागावाटपावर अडून बसले आहेत. त्यातच मायावतींनी दुसऱ्या पक्षाबरोबर बोलणी करुन आघाडीची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेस-बसपात आघाडी होण्याची शक्यता धुसर झालेय.
मध्य प्रदेशमध्ये आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी मायावतींनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या पक्षासोबत आघाडीची घोषणा केली. त्यामुळे आता मध्य प्रदेशात काँग्रेस बसपाला कसा प्रतिसाद देणार आणि किती जागांचा प्रस्ताव देणार याकडे लक्ष लागलंय.