काँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय.

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 13, 2018, 05:04 PM IST
काँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा title=

नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय. पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, इच्छुक ज्योतिरादित्य शिंदेही पोहोचले आहेत. सोनिया, राहुल, ज्योतिरादित्य यांच्यात बैठक सुरु आहे. थोड्याच वेळात राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला चांगल यश मिळाल्यानंतर या ठिकाणी आता पक्षांतर्गत मुख्यमंत्री पदासाठी चुरस निर्माण झालेय. दोन्ही ठिकाणी युवा नेत्यांना संधी देण्याची मागणी होत आहे. मात्र, जुन्या कार्यकर्त्यांनी आधीच्या मुख्यमंत्र्याना आणि ज्येष्ठ नेत्यांच्या नावाचा आग्रह केलाय. त्यामुळे कोणाला संधी द्यायची हा पक्षासमोर पेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवडीवरून खल सुरू आहे. याच संदर्भात राहुल गांधी यांनी आज सर्व नेत्यांना दिल्लीला पाचारण केले. 

तसेच काँग्रेस बैठकीसाठी पर्यवेक्षक के सी वेणुगोपाल आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे देखील उपस्थित आहेत. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये सचिन पायलट हवेत, अशी युवा कार्यकर्त्यांची मागणी आहे. सचिन पायलट यांचे समर्थक गुरुवारी दिल्लीत दाखल झालेत. काँग्रेस मुख्यालयासमोर त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 'सचिन... सचिन' अशी घोषणाबाजी करत त्यांनी पक्ष प्रमुखांकडे पायलट यांनाच राजस्थानची जबाबदारी सोपवण्याची मागणी केलीय. 

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला आणला जाऊ शकतो. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे  तर राजस्थानमध्ये अशोक  गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चुरस आहे. त्यामुळे कोणा एकाला मुख्यमंत्रीपद मिळाल्यास, पक्षात गटबाजी होण्याची भीती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉ़र्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे.