कॉंग्रेस रमली मूर्खांच्या नंदनवनात; जेष्ठ नेत्याचीच पक्षश्रेष्टींवर कडाडून टीका

Congress | 8 वर्षांनंतरही आपल्या ऱ्हासाची कारणं काँग्रेस नेतृत्वाला शोधता येत नसतील तर आपण मूर्खांच्या नंदनवनात रमलो आहोत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलीय. 

Updated: Mar 15, 2022, 08:45 AM IST
कॉंग्रेस रमली मूर्खांच्या नंदनवनात; जेष्ठ नेत्याचीच पक्षश्रेष्टींवर कडाडून टीका title=

मुंबई : 8 वर्षांनंतरही आपल्या ऱ्हासाची कारणं काँग्रेस नेतृत्वाला शोधता येत नसतील तर आपण मूर्खांच्या नंदनवनात रमलो आहोत अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलीय. 

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर कॉंग्रेसनेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आत कॉंग्रेसच्याच जेष्ठ नेत्याने कॉंग्रेस नेतृत्वावर सडकून टीका केली आहे. 

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री कपील सिब्बल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस नेतृत्वावर जोरदार टीका केलीय. काँग्रेसमधील नाराज 23 नेत्यांमध्ये सिब्बल एक प्रमुख नेते आहेत. 

सब की काँग्रेस असायला हवी पण काही नेत्यांना घर की काँग्रेस हवी आहे... माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी सब की काँग्रेससाठी लढा देईन असं सिब्बल म्हणाले. काँग्रेस कार्यकारिणी ख-या काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतच नाही असा घणाघाती वार त्यांनी केलाय. 

खरी काँग्रेस CWC च्या बाहेर आहे. त्यांचा आवाज ऐकण्याची गरज आहे.  काँग्रेसमध्ये सुधारणांची मागणी करणाऱ्या ग्रुप 23 च्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल हे पहिले नेते आहेत, ज्यांनी सोनिया गांधींना पायउतार व्हावे असे उघडपणे आवाहन केले आहे. आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडून दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

सर्वांची काँग्रेस म्हणजे केवळ सोबत राहणे नव्हे, तर भारतातील ज्यांना भाजप नको आहे अशा सर्वांना एकत्र आणणे. या देशातील सर्व संस्थांच्या निरंकुश कारभाराच्या विरोधात असलेल्या परिवर्तनाच्या सर्व शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.