मध्य प्रदेश, राजस्थान मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी राहुल गांधींच्या घरी बैठक, प्रियांकाही उपस्थित

सचिन पायलट यांचे समर्थक गुरुवारी दिल्लीत दाखल झालेत... 

Updated: Dec 13, 2018, 01:42 PM IST
मध्य प्रदेश, राजस्थान मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी राहुल गांधींच्या घरी बैठक, प्रियांकाही उपस्थित  title=

नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर या ठिकाणी आता पक्षांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवडीवरून खल सुरू आहे. याच संदर्भात राहुल गांधी यांनी आज सर्व नेत्यांना दिल्लीला पाचारण केलंय. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, या बैठकीसाठी काँग्रेसचे पर्यवेक्षक के सी वेणुगोपाल आणि प्रियांका वाड्रा हेदेखील उपस्थित आहेत. 

'सचिन... सचिन' जोरदार घोषणाबाजी

दरम्यान, सचिन पायलट यांचे समर्थक गुरुवारी दिल्लीत दाखल झालेत... काँग्रेस मुख्यालयासमोर त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 'सचिन... सचिन' अशी घोषणाबाजी करत त्यांनी पक्ष प्रमुखांकडे पायलट यांनाच राजस्थानची जबाबदारी सोपवण्याची मागणी केलीय. 

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला आणला जाऊ शकतो. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे  तर राजस्थानमध्ये अशोक  गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चुरस आहे. त्यामुळे कुणा एकाला मुख्यमंत्रीपद मिळाल्यास, पक्षात गटबाजी होण्याची भीती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉ़र्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नावावर सहमती झाली असली तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. दोन्ही राज्यात सरकार नेता निवडीचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय.मुख्यमंत्री पदाचे दावेदार उमेदवार आणि केंद्रीय निरीक्षक निर्णयासाठी दिल्लीत राहुल गांधींशी चर्चा करणार आहे.

गेहलोत-पायलट यांच्यात चुरस

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदावरून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्य़क्ष सचिन पायलट यांच्यात चुरस आहे. काल सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज पक्ष निरीक्षक राहुल गांधींची भेट घेणार आहेत. संसदीय दलाच्या बैठकीत आमदारांनी नेता निवडीचे सर्व अधिकार राहुल गांधींना दिले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधीच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. तत्पूर्वी काल आमदारांच्या पहिल्याच बैठकीत प्रदेश काँग्रेसमधली रस्सीखेच समोर आली. मुख्यमंत्रीपदाचे दोन दावेदार, सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली.

कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

दुसरीकडे, काल दिवसभराची रस्सीखेच झाल्यावर मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये आज सकाळी कमलनाथ यांच्याच खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा येणार हे स्पष्ट होतंय. सूत्रांच्य़ा माहितीनुसार नव्या आमदारांच्या बैठकीत कमलनाथ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालंय. काल दिवसभर भोपाळ शहरात ज्योतिरादित्य शिंदेंच्या समर्थकांनी बाईक रॅली काढून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. तर कमलनाथ यांचेही समर्थक मोठ्या संख्येनं शहरात उपस्थित होते. पण संध्याकाळी उशिरा कमलनाथ यांच्या नावावर आमदारांच्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीला रवाना झालेयत. आज हे दोघेही राहुल गांधींची भेट घेणारयत. त्यानंतर संध्याकाळी भोपाळमध्ये आमदारांच्या बैठकीत कमलनाथ यांच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवडीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात येईल, असंही सूत्रांनी म्हटलंय..