नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने प्रचाराच्या दृष्टीने पावलं उचलली असून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधीसुद्धा यात हिरीरिने सहभागी झाल्या आहेत. राजकीय पटलावर सक्रिय झाल्यानंतर आता त्या काँग्रेससाठीच्या प्रचारात व्यग्र झाल्या आहेत. २० मार्चला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात, वाराणसीत प्रचार करणार आहेत.
प्रचारादरम्यान गंगाकिनारी असलेल्या विविध घाटांना त्या भेट देणार आहेत. तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असणाऱ्या प्रियंका गांधी प्रियंका गांधी तीन दिवसांचा उत्तरप्रदेश दौरा करत आहेत. १८ मार्चला त्यांच्या या दौऱ्याची सुरूवात होणार असून हा प्रवास त्या मोटारबोटीतून करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मोटरबोटीतून वाराणसी यात्रा करण्यासाठी गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे परवानगीही मागितली आहे.
होळीच्या उत्सवाआधी या प्रचाराच्या नौका यात्रेला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये विविध संगमला भेट दिल्यानंतर प्रियंका गांधी वाराणासी भागात असणाऱ्या काही मंदिरांनाही भेट देणार असल्याचं कळत आहे. या प्रवासात त्या काही प्रचारसभांनाही संबोधित करणार असून, सिरसा, सितामणी आणि मिर्झापूर या भागातील मतदारांची भेटही घेणार आहेत. २० मार्चचा संपूर्ण दिवस त्या मोदींच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणासी येथे असणार आहेत. काशी विश्वनाथ मंदिर, शितळा मंदिर, दशाश्वमेध घाट, अस्सी घाट अशा टप्प्यांवर त्या थांबणार असून, जनतेशी संवाद साधणार आहेत. यामध्ये त्यांना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचीही साथ लाभणार आहे.
प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये प्रचारसभा घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी जनतेशी थेट संवाद करत काही मुद्दे मांडले होते. त्यांच्या या भाषणाकडे राजकीय नेतेंमडळींचं चांगलच लक्ष लागलेलं होतं. प्रियंका अमेठी आणि रायबरेली या मतदार संघांसाठीच यापूर्वी प्रचार करण्यात सहभाग घ्यायच्या. पण, महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली असून, विरोधकांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.