Congress President Election : तब्बल दोन दशकांनंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाच्या (Gandhi Family) बाहेरची व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदावर (Congress President) विराजमान होणार आहे. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि शशी थरुर (Shashi Tharur) हे दोघेही काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यातही गेहलोत यांचं नाव आघाडीवर आहे. कारण काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांना गांधी परिवारातून पहिली पसंती असल्याचं बोललं जातंय. जयपूरच्या चिंतन शिबिरात ठरलेल्या एक व्यक्त एक पद या धोरणाची आठवण नुकतीच राहुल गांधींनी (Rahul Gandhi) करून दिली.
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री (Rajasthan CM) असणारे गेहलोत काय करणार, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेणार की मुख्यमंत्रिपदावर राहणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचं मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवलीय. त्यामुळे शशी थरुर यांच्यापेक्षाही गेहलोत हेच काँग्रेस अध्यक्ष होतील असं बोललं जातंय.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला गेहलोत तयार आहेत. मात्र या पदावर ते आपल्या मर्जीतल्या कुणाला तरी बसवणार की गांधी कुटुंबीय सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्याकडे धुरा सोपवून दिलेला शब्द पाळणार याची आता चर्चा सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर 27 सप्टेंबरला राजस्थानचे काँग्रेस आमदार दिल्लीला जातायत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसोबतच राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलाय.