राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही राजघाटवर आंदोलन

Congress Satyagraha: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualification) केल्यानंतर काँग्रेसकडून (Congress) आज एकदिवसीय सत्याग्रह (Satyagrah) आंदोलन करत निषेध केला जात आहे. आपल्या नेत्याला शांत करण्यासाठी आखण्यात आलेला हा कट असेल असं काँग्रेसने म्हटल आहे.  

Updated: Mar 26, 2023, 11:03 AM IST
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही राजघाटवर आंदोलन title=

Congress Satyagraha: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द (Rahul Gandhi Disqualification) केल्यानंतर काँग्रेसने (Congress) आक्रमक भूमिका घेतली आहे. सूरत कोर्टाने (Surat Court) मोदी (Modi) आडनावावरुन केलेल्या टिप्पणीनंतर दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने तात्काळ कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज सत्याग्रह (Satyagrah) आंदोलन आयोजित केलं आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात हे आंदोलन केलं जात आहे. 

Rahul Gandhi Disqualification: "मी गांधी आहे, सावरकर नाही", मोदींचा उल्लेख करत राहुल गांधींचं मोठं विधान

 

दिल्ली पोलिसांनी राज घाटवर आंदोलन करण्याची परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणांमुळे परवानगी नाकारील होती. दरम्यान दिल्ली पोलिसांनी राज घाटच्या आसपास सुरक्षा वाढवली असून गर्दी करण्यावर बंदी आणली आहे. 

काँग्रेसने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने नाराजी जाहीर करताना आपल्या नेत्याला शांत करण्याचा हा कट असल्याचा दावा केला आहे. राहुल गांधी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत असताना तसंच गेल्या एका दशकापासून विरोधकांचा आवाज झाल्याने त्यांना शांत करण्याचा हा कट असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. 

राहुल गांधी यांनीही या कारवाईचा निषेध केला असून शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. "अदानीसंबंधी मी केलेल्या भाषणानंतर पंतप्रधान घाबरले असून त्यांच्या डोळ्यात मी भीती पाहिली आहे. लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई करत माझी खासदारकी रद्द केली," असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. 

दरम्यान यावेळी त्यांनी भाजपाच्या माफी मागण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सावरकरांचा उल्लेख करत आपण गांधी असल्याचं सांगितलं. "माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाही. संसदेत मी बोलू देण्याची विनंती केली, दोनवेळा पत्र लिहिलं, लोकसभा अध्यक्षांची भेटही घेतली पण काहीच झालं नाही. मग आता कदाचित नरेंद्र मोदींना भेटावं लागेल. ते तर हे होऊ देणारच नाहीत," असं राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.