प्रियंका गांधींमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसची मते वाढणार पण....

प्रियंकांमुळे सपा-बसपा युतीला ७ जागांचे नुकसान सहन करावे लागेल.

Updated: Feb 6, 2019, 09:35 PM IST
प्रियंका गांधींमुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसची मते वाढणार पण.... title=

लखनऊ: प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाने पूर्व उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता एका अहवालात वर्तवण्यात आली आहे. इंडिया टीव्ही- सीएनएक्सने पूर्व उत्तर प्रदेशातील ४३ जागांवर हे सर्वेक्षण केले. यामध्ये काही रंजक निरीक्षणे समोर आली आहेत. त्यानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रियंका यांच्या करिष्म्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या भागात मृतप्राय असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल. मात्र, त्यामुळे भाजपला फारसा फरक पडणार नाही. उलट सपा-बसपाच्या युतीसाठी प्रियंकांची एन्ट्री प्रतिकूल ठरणार असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 

यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणांच्या तुलनेत प्रियंकांमुळे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी निश्चितच वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी, योगी आदित्यनाथ यांचा पूर्वीचा मतदारसंघ गोरखपूर, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे मतदारसंघही त्याला अपवाद नाहीत. वाराणसी मतदारसंघातील काँग्रेसच्या मतांची टक्केवारी १६ वरून २८ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे पूर्व उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या जागा वाढतीलच असे नाही. सर्वेक्षणानुसार, पूर्व उत्तर प्रदेशातील ४३ जागांपैकी काँग्रेसला अवघ्या ४, भाजपप्रणित आघाडीला २० आणि सपा-बसपा युतीला १९ जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात याठिकाणी सपा-बसपाला २६ जागा तर भाजपला १५ जागा मिळण्याची शक्यता होती. मात्र, प्रियंकांमुळे सपा-बसपा युतीला ७ जागांचे नुकसान सहन करावे लागेल. मात्र, भाजपच्या ५ जागा वाढतील, असे आश्चर्यकारक निरीक्षण या अहवालातून समोर आले. प्रियंका गांधी यांनी बुधवारी दुपारी काँग्रेस मुख्यालयात जाऊन पक्षाच्या महासचिवपदाची सूत्रे हाती घेतली. यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे.