चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या सर्व राज्यांना सूचना

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,528 रुग्ण आढळले आहेत. तर 149 लोकांचा मृत्यू झाला, जो कालच्या तुलनेत 89 अधिक आहे.

Updated: Mar 18, 2022, 01:30 PM IST
चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट,  केंद्रीय आरोग्य सचिवांच्या सर्व राज्यांना सूचना title=

Corona Cases in India : देशात होळीचा उत्साह साजरा होत असतानाच काहीशी चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात कोरोना (corona) रुग्णसंख्येत घट होत असली तरी काही देशात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने  जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात कोरोनाचे 2528 रुग्ण आढळले आहेत. तर 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण कालच्या तुलनेत 89 ने अधिक आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे देशात आता केवळ 29 हजार 181 सक्रिय रुग्णसंख्या आहे. देशात कोरोना बाधित रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. देशात आतापर्यंत एकुण 4.24 कोटी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तर आतापर्यंत पाच लाख 16 हजार 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

भारतात कोरोनाची स्थिती
कोरोनाचे सक्रिय रुग्ण : 29, 181 (0.07%)
दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट :  0.40%
बरे झालेले रुग्ण : 4,24,58,543
एकुण मृत्यू : 5,16,281
आतापर्यंतचं लसीकरण : 1,80,97,94,58

चीनमध्ये वाढत्या संसर्गाने भारत सावध
चीन आणि आग्नेय आशियासह युरोपातील काही देशांमध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता भारत सरकार सावध झालं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून सतर्क केलंआहे.

कोरोना संपला असा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासनाने बेफिकीर राहू नये, असं भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे. राजेश भूषण यांनी आपल्या पत्रात सर्व राज्यांना सावध राहण्यास आणि पंचसूत्रीचं पालन करण्यास सांगितलं आहे.  चाचणी, ट्रेसिंग, उपचार, संपूर्ण लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक उपाययोजना अवलंबण्यास सांगितलं आहे. 

मुंबईत 73 नवे रुग्ण
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या चोवीस तासात ७३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे गेल्या चोवीस तासात शुन्य मृत्यूची नोंद झाली आहे. 

दिल्लीत गेल्या 24 तासात 148 प्रकरण
दिल्लीत गेल्या चोवीस तासात 148 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता दिल्लीत एकुण सक्रिय रुग्णांची संख्या 610 इतकी आहे.

उत्तर प्रदेशमध्ये निर्बंध हटवले
कोरोनाच्या संख्येत घट झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील जलतरण तलाव, विवाहसोहळे आणि अंगणवाडी केंद्रांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.