नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी लस बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण कोरोनाची लस आल्यानंतर ही लस कशी देण्यात येणार? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतात मात्र नाकातून कोरोनाची लस दिली जाऊ शकते.
भारतामध्ये कोरोना लस बनवत असलेल्या भारत बायोटेकने लशीसाठी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनसोबत करार केला आहे. कोरोनाची लस बनवत असलेल्या दोन्ही देशांनी याचं उत्तर शोधलं आहे. रिसर्चनुसार कोरोनाची लस इंजेक्शनच्या माध्यमातून नाही, तर नाकाच्या माध्यमातून दिली जाईल. नाकातून ड्रॉप टाकून ही लस रुग्णांना दिली जाईल.
हैदराबादमध्ये असलेलं भारत बायोटेक कोरोफ्लू नावाची लस विकसित करत आहे. ही लस यशस्वी झालली तर रुग्णाला १ थेंब नाकातून देण्यात येईल. भारत बायोटेकने ही लस अमेरिका, जपान आणि युरोपमध्ये वाटण्याचे सगळे अधिकार मिळवले आहेत.
या लसीच्या फेज-१ ची ट्रायल अमेरिकेच्या सेंट लुईस युनिव्हर्सिटीच्या व्हॅक्सिन ऍण्ड ट्रीटमेंट इव्हेल्युएशन युनिटमध्ये होईल. जर भारत बायोटेकला गरजेची असलेली परवानगी आणि अधिकार मिळाले, तर याची चाचणी हैदराबादच्या जीनोम व्हॅलीमध्येही होईल.
भारत बायोटेकचे चेयरमन डॉ. कृष्णा एला यांनी लसीचे १०० कोटी डोस बनवणार असल्याची माहिती दिली. ही लस नाकातून देण्यात येणार असल्यामुळे सुई, सीरिंजचा कोणताही खर्च येणार नाही, त्यामुळे लसीची किंमत कमी असेल. उंदरावर केलेल्या या लसीच्या चाचणीत चांगले परिणाम दिसले आहेत. याचा रिपोर्ट प्रसिद्ध सायन्स जनरल सेल ऍण्ड नेचर मॅगझिनमध्ये छापण्यात आला आहे.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या रेडिएशन ऑन्कोलॉजीचे प्रोफेसर आणि बायोलॉजिक थेराप्युटिक्स सेंटरचे संचालक डॉ. डेव्हिड टी क्युरिएल म्हणाले, नाकातून देण्यात येणारी लस नेहमीच्या लसीपेक्षा चांगली असते. व्हायरस जिकडून सगळ्यात आधी नुकसान पोहोचवायला सुरुवात करतो तिकडेच ही लस हल्ला करते. त्यामुळे सुरुवातीलाच व्हायरसला रोखण्याचं काम सुरू होतं.