Couple Jumps Into Ditch: सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. अनेकदा या रिल्स आणि फोटोंच्या नादात लोक जीव धोक्यात घालतात. तर, कधी कधी रिल शूट करण्याच्या नादात काहींनी जीव गमावल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील एका घटनेने खळबळ उडाली आहे. फोटो काढण्यासाठी एका दाम्पत्याने केलेली करमत त्यांच्याच जीवावर बेतली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एका दाम्पत्याने जीव धोक्यात घातला आहे.
रेल्वे रूळांवर सेल्फी घेणे या दाम्पत्याला महागात पडले आहे. विचित्रपणे ट्रेनच्या रुळांवर सेल्फी घेत असलेल्या या जोडप्याला समोरुन ट्रेन येऊ शकते, याचा जराही विचार मनात आला नाही. पती-पत्नी सेल्फी घेत असताना अचानक ट्रेन समोरुन आली. त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हीदेखील हैराण व्हाल. ट्रेन भरधाव वेगाने समोरून येत असताना पती-पत्नी घाबरले आणि त्याने रेल्वे रुळांवरुन खोल दरीत उडी घेतली. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिले आणि एकच खळबळ माजली. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या या जोडप्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येतंय.
राजस्थानमध्ये मान्सून सक्रीय झाला आहे. त्यानंतर पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी पाली जिल्ह्यातील गोरम घाट पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. तिथेच राहुल आणि जान्हवी हे जोडपं फिरण्यासाठी आलं होतं. पुलिया येथील एका रेल्वे ट्रॅकवर हे जोडपं उभं राहून सेल्फी घेत होतं. मात्र, त्यांना थोडादेखील अंदाज नव्हता की यामुळं त्यांना प्राण गमवावा लागू शकतो.
पती आणि पत्नी या दोघांनाही थोडीदेखील कल्पना नव्हती की त्यांच्यासोबत काय होणार आहे. फोटो काढत असताना अचानक त्यांच्यासमोर ट्रेन आली. समोरून ट्रेन येत असताना ते खूप घाबरले होते. अशावेळी काय करायचं हे त्यांना सूचलच नाही. वेगाने ट्रेन समोरुन येताना दिसली तेव्हा त्यांनी दरीत उडी घेतली. हे दृष्य पाहिल्यानंतर आजूबाजूला असलेल्या लोकं हादरले. त्यांनी लगेचच प्रशासनाला याबद्दल माहिती दिली.
या घटनेनंतर तिथे असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोक जोरजोरात किंचाळत होते. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जिथे उडी घेतली तिथे त्यांना शोधण्यात आलं. त्यानंतर जखमी झालेल्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण दोघांचीही प्रकृती नाजूक आहे. दोघंही त्यांच्या नातेवाईकांसोबत फिरण्यासाठी आले होते.