coronavirus: 'ही' लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांचा इशारा

'ही लक्षणं सहसा दुर्लक्षित केली जातात आणि बदलत्या हवामानामुळे झालेला आजार म्हणून याकडे पाहिलं जातं. परंतु...'

Updated: Jul 7, 2020, 03:08 PM IST
coronavirus: 'ही' लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांचा इशारा title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या लक्षणांच्या यादीमध्ये डॉक्टरांकडून आणखी काही लक्षणं जोडली गेली आहेत. हैदराबादमधील चेस्ट किंग कोटी (Chest and King Koti) रुग्णालयातील डॉक्टरांनी स्थानिक मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून एक मेडिकल रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात डायरिया, डोकेदुखी आणि उलटी होणं हीदेखील भारतात कोरोना व्हायरसची लक्षणं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही लक्षणं सहसा दुर्लक्षित केली जातात आणि बदलत्या हवामानामुळे झालेला आजार किंवा अन्न विषबाधा मानली म्हणून याकडे पाहिलं जातं. परंतु, कोरोना व्हायरस आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हवामानानुसार आपली जीनोमिक रचना बदलत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

सामान्यत: खोकला, ताप, श्वासोच्छवास घेण्यास त्रास यासारखी लक्षणं दिसून आल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्गाची चाचणी करुन त्यावर उपचार केले जातात. परंतु आता असेही रुग्ण आढळत आहेत, ज्यांना सुरुवातीला डायरिया, डोकेदुखी आणि उलटी होण्याची समस्या होती आणि त्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. उपचार करण्यात उशिर झाल्यानेही अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

हैदराबादमध्ये 20 जून ते 30 जूनपर्यंत 67 पैकी 30 रुग्णांचा मृत्यू उपचारास उशिर झाल्याने झाल्याच सांगण्यात आलं आहे. वेगवेगळ्या लक्षणांमुळे, रुग्णांना संसर्ग ओळखण्यास उशीर झाला आणि यामुळे ते उशिरा उपचारासाठी दाखल झाले. जर एखाद्या व्यक्तीला डायरिया अर्थात अतिसार, डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असेल तर अशा लोकांनीदेखील कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

रिपोर्टनुसार, डायरिया सामान्यपणे हवामानातील बदलामुळे झालेला आजार मानला जातो. पण कोरोना व्हायरस आता फुफ्फुसांपेक्षा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवर (Gastro-intestinal tract) हल्ला करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे डायरिया, उलटी आणि डिहायड्रेशन होतं. परिणामी अशक्तपणा, ऑक्सिजनची पातळी कमी होणं, कमी रक्तदाब आणि साखर कमी होणं आणि अचानक बेशुद्धपणा यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच, डॉक्टरांनी डायरिया अर्थात अतिसार किंवा तीव्र डोकेदुखी असलेल्या लोकांची देखील कोरोना तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन वेळेत संसर्ग ओळखण्यास मदत होऊ शकते, असं म्हटलं आहे.