Covid 19 XE Veriant : कोरोनाच्या नव्या एक्सई व्हेरिएंटने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. XE व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण भारतात याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याबाबत तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. वायरोलॉजिस्ट डॉक्टर गगनदीप कांग यांनी म्हटलं की, 'XE व्हेरिएंट हा इतर सब व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त गंभीर असण्याची शक्यता कमी आहे. व्हेरिएंट येत राहतील. कारण लोकांचा प्रवास वाढला आहे.'
BA.2 व्हेरिएंट हा BA.1 व्हेरिएंट पेक्षा अधिक गंभीर असेल असं मानलं जात होतं. पण तसं झालं नाही. एक्सई व्हेरिएंट बीए1 आणि बीए2 पासून बनलेला आहे. पण तो यांच्या पेक्षा अधिक गंभीर असेल असं वाटत नाही असं देखील डॉक्टर गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे.
WHO ने XE व्हेरिएंटबाबत इशारा दिला आहे. ओमायक्रॉनचा हा व्हेरिएंट सर्वात आधी यूकेमध्ये आढळला. हा अधिक वेगाने पसरणारा व्हायरस असल्याचं WHO ने म्हटलं आहे.
भारतात देखील XE व्हेरिएंटबाबत संभ्रम कायम आहे. मुंबईत एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चाचणीमध्ये एक्सई व्हेरिएंट आढळल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. पण केंद्र सरकारचं मत वेगळं आहे. चाचणीमध्ये काही तरी चूक झाली असेल असेल असं केंद्राचं म्हणणं आहे. त्यामुळे एक्सई व्हेरिएंट खरंच मुंबईत दाखल झाला आहे का याबाबत संभ्रम आहे.
60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी बुस्टर डोस प्रभावी ठरेल. पण 60 पेक्षा कमी वयाच्या लोकांना बुस्टर डोस किती प्रभावी ठरेल याचा डेटा उपलब्ध नाही. एक्सई व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी डोस प्रभावी ठरेल का हे पाहावं लागेल.
ऑफ्रिकेतून मुंबईत आलेल्या महिलेने दोन्ही डोस घेतले आहेत. पण तरी देखील तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.