बापरे, देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या घरात

देशात गेल्या २४तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Aug 15, 2020, 10:39 AM IST
बापरे, देशात कोरोना रुग्णांचा आकडा २५ लाखांच्या घरात

मुंबई : देशात गेल्या २४तासांमध्ये ६५ हजार २ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजार १९३ झाली आहे. एकूण मृत्यूचा आकडा ४९ हजार ३६ वर पोहोचला आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१७ टक्क्यांवर आले असून मृत्यूदर १.९५ टक्क्यांवर आला आहे.

गेल्या २४तासांमध्ये ५५ हजार ५७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७ लाख ५१ हजार ५५५ झाली आहे.  ६ लाख ६१ हजार ५९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर गेल्या २४तासांमध्ये ८ लाख ६८ हजार ६७९ इतक्या विक्रमी नमुना चाचण्या केल्या गेल्या. एकूण २.८५ कोटी चाचण्या झाल्या आहेत. 

१० लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन सरासरी ६०३ चाचण्या घेतल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हे प्रमाण १४० चाचण्या इतके असणे गरजेचे आहे. ३४ राज्यांमध्ये प्रतिदिन राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत.

 महाराष्ट्र राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के  एवढे आहे. आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना मृतांची संख्या मात्र सात हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.५ टक्के  असून तो कमी करण्याचे आव्हान  पालिकेपुढे आहे. शुक्रवारी ४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर मृतांची एकूण संख्या ७,०३५ वर पोहोचली. त्याचबरोबर ९७९ नवीन रुग्ण आढळले असून ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर  दिवसेंदिवस कमी होत असून रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दर ०.८० टक्के  आहे.