बनावट दारुमुळे मृत्यूतांडव! तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू; अनेकजण रुग्णालयात दाखल

Tamil Nadu : सर्वांचा बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये चौघांना वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा दोघांचा अतिदक्षता विभागात असताना मृत्यू झाला. 

आकाश नेटके | Updated: May 15, 2023, 12:46 PM IST
बनावट दारुमुळे मृत्यूतांडव! तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू; अनेकजण रुग्णालयात दाखल title=

Spurious Liquor in Tamil Nadu : तामिळनाडूमधून (Tamil Nadu News) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातून कथितरित्या बनावट दारू (Spurious Liquor) प्यायल्याने तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. विल्लुपुरम जिल्ह्यातील मारक्कनमजवळील इक्कियारकुप्पम येथील सहा लोकांचा रविवारी मृत्यू झाला होता. तर चेंगलपट्टू जिल्ह्यातील मदुरंथागममध्ये शुक्रवारी दोन लोकांचा मृत्यू झाला आणि रविवारी एका जोडप्याचा मृत्यू झाला. या सर्वांचा बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेकजण रुग्णालयात दाखल आहेत.

तीन महिलांसह 12 जणांचा मृत्यू झाल्यामुळे तामिळनाडूमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू या जिल्ह्यांमध्ये झालेल्या दोन घटनांमध्ये 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. सध्या, लोकांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी योग्य कारवाईचे करण्यात येणार असून मृत्यू झालेल्या सर्वांनी इथेनॉल-मिथेनॉल पदार्थांनी बनवलेले मद्य प्यायल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक (उत्तर) एन कन्नन यांनी दिली.

सुरुवातीला चेंगलपट्टू जिल्ह्यात पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चेंगलपट्टू जिल्ह्यातील घटनेप्रकरणी आरोपी अम्मावसई याला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांतील काही आरोपी फरार असून आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे, उलट्या, डोळ्यात जळजळ, उलट्या आणि चक्कर येणे अशा तक्रारींनंतर शनिवारी विल्लुपुरम जिल्ह्यातील एकियाकुप्पम गावात सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात पोहोचले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान, आयसीयूमध्ये उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. विल्लुपुरम जिल्ह्यातील मृतांची संख्या सर्वात जास्त आहे.

दुसरीकडे या दोन्ही घटनांमधील संबंधाचा कोणताही पुरावा आतापर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. दोन्ही घटनांमधील संबंध शोधण्यासाठी तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या घटनेत अमरन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून बनावट दारूही जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मिथेनॉल आहे की नाही हे तपासण्यासाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.