धक्कादायक! कार्यालयात घुसून तलवारीने हल्ला, कंपनीच्या CEO आणि MD ची निर्घृण हत्या

बंगळुरुमध्ये मंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली. इथल्या एका कंपनीत माजी कर्मचाऱ्याने घुसून कंपनीचे सीईओ आणि मॅनेजिंक डिरेक्टर यांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

राजीव कासले | Updated: Jul 11, 2023, 09:54 PM IST
धक्कादायक! कार्यालयात घुसून तलवारीने हल्ला, कंपनीच्या CEO आणि MD ची निर्घृण हत्या title=

Crime News : कंपनीत घुसून कंपनीच्या दोन बड्या अधिकाऱ्यांची (Officers) निर्घृण हत्या (Brutally Killed) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरुमध्ये (Bangalore) एका टेक कंपनीत ही धक्कादायक घटना घडली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांची तलवारीने वार करत हत्या करण्यात आली. सीईओ वीनू कुमार आणि एमडी फणींद्र सुब्रमण्यम अशी मृतांची नावं आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने कंपनीत एकच खळबळ उडाली. हत्या करुन आरोपी तिथून फरार झाला.  

दुहेरी हत्याकांडाने बंगळुरु हादरलं असून फेलिक्स असं आरोपीचं नाव असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फेलिक्सने कंपनीतून राजीनामा दिला होता आणि स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. पण वीनू कुमार आणि फणींद्र सुब्रमण्यम त्याच्या व्यवसायात अडथळा निर्माण करत होते.त्यामुळे फेलिक्स नाराज होता. याच संतापातून मंगळवारी तो तलवार घेऊन कंपनीत घुसला आणि वीनू कुमार फणींद्र यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. 

घटनेच्यावेळी वीणू कुमार आणि फणींद्र कंपनीत आपल्या कार्यायलात बसले होते. फेलिक्सने अतिशय नियोजनबद्ध कट आखला होता. संध्याकाळी चारच्या सुमारास फेलिक्स तलवार आणि चाकू शर्टखाली लपवून कंपनती घुसला आणि थेट वीणू कुमार आणि फणींद्र जिथे बसतात त्या कार्यालयात गेला. काही कळायच्या आतच त्याने तलवार काढली आणि दोघांवर सपासप वार करायला सुरुवात केली. वीनू कुमार आणि फणींद्र यांनी स्वत:ला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी ते दोघंही कंपनीत धावत सुटले. पण सुडाने पेटलेल्या फेलिक्सने त्यांना कोणतीच संधी दिली नाही. दोघांचा पाठलाग करत त्यांची निर्घृण हत्या केली. 

फेलिक्स वीनू कुमार आणि फणींद्र यांच्यावर हल्ला करत असताना कंपनीत एकच गदारोळ माजला. कंपनीचे कर्मचारी जीवाच्या आकंताने सैरभर पळत सुटले. किंचाळ्यांनी कंपनी दणाणून गेली. हत्या केल्यानंतर फेलिक्स तिथून फरार झाला. या दुहेरी हत्याकांडाची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरोनिक्स इंटरनेट कंपनीत ही घटना घडली. फणींद्र सुब्रमण्यम आणि वीनू कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी फेलिक्स हा फरार झालाय.

पोलिसांनी आरोपी फेलिक्सच्या शोधासाठी पथकं तयार केली आहे. आरोपी फेलिक्स हा टिकटॉक आणि रिल्स बनवण्यासाठी प्रसिद्ध होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्सही आहेत. फेलिक्सच्या मनात फणींद्रच्याविरुद्ध प्रचंड राग होता. याप्रकरणी घटनेच्यावेळी कंपनीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे पोलीस तपास करत आहेत.