लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या कॉन्स्टेबलच्या छातीत घुसला चाकू; प्रेयसी म्हणते, कलिंगड कापताना...

Gurugram Crime News: चार वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे गुरुग्राम पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरु केली आहे. सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 24, 2023, 04:23 PM IST
लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या कॉन्स्टेबलच्या छातीत घुसला चाकू; प्रेयसी म्हणते, कलिंगड कापताना... title=

Crime News : गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरणातून होणाऱ्या गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. लिव्ह रिलेशनशिप, एकतर्फी प्रेम यासारख्या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. अशातच हरियाणातील गुरुग्राममध्ये (Gurugram) छातीत वार झाल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आणलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . तरुणाला त्याच्या लिव्ह इन पार्टनरनेच रुग्णालयामध्ये आणले होते. तरुणाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून लिव्ह इन पार्टनरला (Live in Partner) ताब्यात घेऊन तिची चौकशी केली जात आहे.

गुरुवारी रात्री गुरुग्रामच्या डीएलएफ फेज 3 पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय संदीपला उपचारासाठी नारायणा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. संदिपच्या छातीत चाकूने वार करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान संदिपचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांना संदिपला झालेली जखम संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याच्या मृत्यूची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला दिली. डीएलएफ पोलीस माहिती मिळताच रुग्णालयामध्ये पोहोचले.

त्यावेळी संदीपची लिव्ह-इन पार्टनर पूजा शर्मा (25) हिने पोलिसांना सांगितले की, कलिंगड कापताना संदीपच्या छातीमध्ये चाकू घुसला होता.  त्यामुळे त्याला गंभीर जखम झाली. त्याच्या छातीतून भरपूर रक्त येत होते. त्यामुळे मी त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले होते मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

दुसरीकडे घटनेबाबत संदीपच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आम्हाला गुरुवारी रात्री अडीच वाजता संदीपच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. रात्रीच तेही रुग्णालयात पोहोचले होते. मृताच्या चुलत भावाने सांगितले की, संदीपच्या मृत्यूची माहिती त्यांना अडीच वाजता मिळाली. मी सकाळी हांसीहून गुरुग्रामला आलो आहे. माझ्या भावाचा खून झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी.

पूजा शर्माने पुढे सांगितले की ती दिल्लीची रहिवासी आहे. हरियाणामध्ये पूजा सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या संदीपसोबत राहत होती. गेल्या चार वर्षांपासून पूजा आणि संदीप डीएलएफ फेज 3 च्या एस ब्लॉक 55/56 मध्ये लिव्ह इनमध्ये राहत होते. त्याने पोलिसांना पुढे सांगितले की, संदीप हा वाहनांची खरेदी-विक्री करायचा. त्याच दरम्यान तो माझ्या संपर्कात आला आणि त्यानंतर आम्ही दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो. महत्त्वाची बाब म्हणजे पूजा ही देखील सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर आहे.

या घटनेबाबत पोलीस निरीक्षक विकास कौशिक यांनी सांगितले की, "आम्ही संदीपची लिव्ह-इन पार्टनर पूजा शर्माला ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी सुरू आहे. कलिंगड कापताना चाकू लागल्याचे म्हणणे आहे. संदिपच्या छातीवर खोल जखम आहे. पूजाच्या बोलण्याबद्दल आम्हाला शंका आहे. त्यामुळे तिची चौकशी सुरू आहे."