मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण

Man Slits Throat In Temple: अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये तो मंदिरातील हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 16, 2024, 08:14 AM IST
मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण title=
मंदिरातच घडला हा प्रकार (फाइल फोटो)

Man Slits Throat In Temple: मध्य प्रदेशमधील सतना येथील शारदा माता मंदिरामध्ये एका तरुणाने स्वत:चा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने स्वत:लाच केलेली जखम इतकी गंभीर होती की यात त्याने प्राण गमावला. समोर आलेल्या माहितीनुसार, या तरुणीचा ओळख पटली असून तो मुळचा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज जिल्ह्यातील गधागाढा गावातील रहिवासी असल्याचं समजतं. लल्लाराम दहिया असं या व्यक्तीचं नाव होतं. लल्लाराम 37 वर्षांचा होता. ही घटना अंधश्रद्धेमधून घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला

वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मैहर येथे शारदा मातेच्या मंदिरामध्ये हवन कुंडासमोर या व्यक्तीने आपल्या मानेवरुन धारधार वस्तू फिरवली. तरुण स्वत:चाच गळा चिरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याला अडवण्याचा प्रयत्न तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी केला. मात्र तोपर्यंत लल्लारामने आपला गळा चिरला होता. त्याच्या मानेवरुन घळाघळा रक्त वाहू लागल्याने मंदिरात एकच गोंधळ उडाला. अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये मंदिरातील हवन कुंडाजवळची जमीन लाल रंगात न्हाऊन निघाली. मंदिरात नेमकं काय सुरु आहे हे अनेकांना समजतच नव्हतं. हा काहीतरी विचित्र प्रकार असून या व्यक्तीच्या मानेजवळून रक्तस्राव होत असल्याने मंदिरात त्यावेळी उपस्थित असलेल्या काही भक्तांनी तातडीने जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सतनामधील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सुरु केला तपास

समोर आलेल्या माहितीनुसार, लल्लाराम सोमवारी शारदा मातेच्या दर्शनासाठी आला होता. या ठिकाणी त्याने अंधविश्वासामधून स्वत:चा गळा चिरला. आपलं शीर मातेच्या चरणी समर्पित करण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी हाती घेतला आहे. लल्लारामने गळा चिरला तेव्हा मंदिरात उपस्थित असलेल्या साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यापासून सीसीटीव्ही फुटेजपर्यंतचे पुरावे गोळा केले जात आहेत. लल्लारामच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची चौकशी केली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. लल्लारामची अशी कोणती इच्छा होती ज्यासाठी त्याने स्वत:चा गळा मंदिरात चिरला. तो काही तंत्रमंत्रासंदर्भातील वाचन करायचा किंवा कोणाला भेटायचा का याबद्दलची माहिती सध्या पोलिसांकडून गोळा केली जात आहे.