कच्च्या तेलाच्या किंमती शून्य डॉलरपेक्षा कमी, तरीही फुकट मिळणार नाही इंधन, कारण...

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.

Updated: Apr 21, 2020, 04:06 PM IST
कच्च्या तेलाच्या किंमती शून्य डॉलरपेक्षा कमी, तरीही फुकट मिळणार नाही इंधन, कारण... title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही झाला आहे. मागच्या ७४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी झाल्या आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत -३७.६३ डॉलर एवढी झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत एवढी खाली उतरली असली, तरी पेट्रोल आणि डिझेल फुकट मिळणार नाही. कारम सरकार आयात केलेल्या कच्च्या तेलावर एक्साईज ड्यूटी, व्हॅट आणि कमीशन लावतं, यानंतर सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळतं. मागच्या ३ महिन्यांमध्ये कच्च्या तेलाची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरली, तरी सरकारने इंधनाची किंमत कमी करण्याऐवजी एक्साईज ड्यूटी वाढवली.

१ एप्रिलला कच्च्या तेलाची किंमत २३ डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आली होती. म्हणजेच प्रति बॅरलची किंमत ११ रुपये एवढी झाली होती. तरीही १ एप्रिलला दिल्लीमध्ये पेट्रोलची बेस प्राईज २७ रुपये ९६ पैसे ठरवली गेली. यामध्ये २२ रुपये ९८ पैसे एक्साईज ड्यूटी, ३ रुपये ५५ पैसे डीलरचं कमिशन आणि १४ रुपये ७९ पैसे व्हॅट जोडण्यात आला. यामुळे पेट्रोलची किंमत ६९ रुपये २८ पैसे एवढी झाली. या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कितीही कमी झाली तरी देशात पेट्रोल-डिझेलची किंमत कमी होत नाही.