तौत्के चक्रीवादळाचा हाहाकार; पाच जिल्ह्यात रेड अलर्ट

 शनिवारी केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. 

Updated: May 15, 2021, 06:42 PM IST
तौत्के चक्रीवादळाचा हाहाकार; पाच जिल्ह्यात रेड अलर्ट title=

मुंबई : शनिवारी केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. केरळमधील किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून, अनेक घरांचं नुकसान झालं आहे. झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळमधील परिस्थिती पाहाता 16 ते 19 मे दरम्यान हवामान खात्याने  तौत्के चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. भारत हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीची शक्यता असलेल्या मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड या पाच जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

आयएमडीने सांगितले की, आलप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी 40 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , महाराष्ट्रासह  गुजरात, कर्नाटक, केरळच्या सागरी किनाऱ्यावर वादळीवाऱ्यासह 15 मे ते 17 मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Tauktae चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे. सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग, रत्नागिरीला जाणवेल. 16 तारखेला रायगड मुंबई पालघर याठिकाणी परिणाम जाणवेल तर 18 तारखेला हे वादळ गुजरातच्या दिशेने विरावळ, पोरबंदर ते नलिया या किनारपट्ट्यांमध्ये धडकेल. 60 ते 70  प्रति किलोमीटर वाऱ्याच्या वेगामुळे झाडे आणि कच्च्या घरांची पडझड होईल, अशी शक्यता आहे. गुजरानंतर हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने कराचीकडे सरकणार आहे.