मुंबई : मालमत्ता आणि पैसे हा एक वादाचा मुद्दा आहे. यावरुन नात्या नात्यात लोक भांडू लागतात. एवढच काय तर काहीवेळा सख्खे भाऊ या वादावरुन एकमेकांच्या जीवावर उठतात. परंतु यात आता आणखी एक वादाचा मुद्दा आहे. तो म्हणजे मालमत्तेत मुलींना मिळाणारे अधिकार, मालमत्तेत मुलींच्या वाट्यावरुन नेहमीच वाद होत आले आहेत. मुलींना मालमत्तेत कोणते अधिकार मिळतात, हाही गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. कुठेतरी लोक म्हणतात की मुलीला मुलापेक्षा कमी अधिकार आहेत, कुठेतरी म्हणतात की मुलीला अधिकार नाहीत तर कुठे म्हणतात की मुलीला समान अधिकार आहेत.
मुलींचा वडिलांच्या मालमत्तेत मिळणाऱ्या वाट्याबाबत समाजात विविध प्रकारचे गैरसमज सुरू असतात. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचे ज्ञान नसणे. परंतु आज आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला देखील याबाबतीत थोडे ज्ञान मिळवण्यात मदत होईल.
सध्या भारतात मुलींना मालमत्तेत किती अधिकार आहे आणि मुलींना वडिलांच्या मालमत्तेत वाटा कधी मिळत नाही, याबाबत स्पष्ट कायदा आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही गोंधळू जाण्याची गरज नाही.
आपल्या देशात मालमत्तेच्या विभाजनाबाबत वेगवेगळे कायदे आहेत. हा कायदा सर्व धर्मांचा कायदा आहे. यातील काही कायदे संसदेने देखील बनवले आहेत. जसे की हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 भारतातील हिंदूंसाठी तसेच मुस्लिमांसाठी त्यांचे वैयक्तिक कायदे आहेत, असेच कायदे ख्रिश्चनांसाठीही आहेत.
या कायद्यांसोबतच काही कायदे आहेत जे सर्व धर्मांना सारखेच लागू होतात, जसे की भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925. हा कायदा सर्व भारतीयांना धर्मनिरपेक्षपणे लागू होतो. न्यायालये अनेक प्रकरणांमध्ये या कायद्याची मदत घेतात.
जर आपण भारतात व्यापकपणे पाहिले तर दोन प्रकारच्या मालमत्ता असतात. एक अशी मालमत्ता आहे जी व्यक्तीने स्वतः मिळवली आहे आणि दुसरी मालमत्ता आहे जी एखाद्या व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे जी पिढ्यानपिढ्या पुढे जात असते. सामान्यत: काही लोकांकडे अशी वडिलोपार्जित मालमत्ता असते जी अनेक वर्षांपासून त्यांच्या पिढ्यांना मिळत आलेली आहे.
स्वतः मिळवलेली मालमत्ता ही एक साधी बाब आहे. अशी कोणतीही मालमत्ता जी एखाद्या व्यक्तीने स्वत: मिळवली असेल त्याला स्वतःची मालमत्ता म्हणतात किंवा स्व-अधिग्रहित मालमत्ता म्हणतात, मग ती एखाद्या व्यक्तीने विकत घेतली असेल, ती धर्मादाय स्वरूपात प्राप्त झाली असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे हक्क सोडल्याच्या परिणामी प्राप्त झाली असेल, बक्षीस म्हणून प्राप्त झाली असेल, या सर्व मालमत्तेला स्व-अधिग्रहित मालमत्ता म्हणतात.
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः मालमत्ता घेते तेव्हा त्या व्यक्तीला तिच्या मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अनन्य अधिकार असतो. भारतीय उत्तराधिकार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
आता त्यांना मुले असली तरी कोणताही निर्णय घ्यायला त्यांना कोणीही भाग पाडू शकत नाही. समाजात असाही संभ्रम आहे की, मुलांना वाटते की आपण वडिलांना आपली मालमत्ता विकण्यापासून रोखू शकतो, तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे, एक बाप आपली मालमत्ता कुठेही विकू शकतो, त्याला थांबवण्याचा अधिकार मुलांना नसतो.
वडिलांच्या मृत्यूनंतरच मुलगी आणि मुलाला संपत्तीत हक्क मिळतो. त्यात देखील जर वडिलांना आपल्या मृत्यूनंतर संपत्ती कोणाला द्यायाची हे ठरवले असेल किंवा तसे कागदपत्र तयार केले असेल तर यामध्ये काहीही बदल होणे शक्य नाही. परंतु जर वडिलांनी अशी कोणतीही कागदपत्रे तयार केलेली नसतील, तर त्यांच्या मुलांना म्हणजेच मुलगा किंवा मुलीला ती मालमत्ता मिळते.
यासाठी हिंदूंच्या बाबतीत हिंदू उत्तराधिकार कायदा लागू होतो आणि मुस्लिमांच्या बाबतीत मुस्लिम वैयक्तिक कायदा लागू होतो. हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार दिले जातात. कोणत्याही मालमत्तेत जितका अधिकार मुलाला मिळतो तितकाच हक्क मुलीला देखील मिळतो.
मुलीचे लग्न झाले आहे आणि तिच्या पतीच्या मालमत्तेत तिला हक्क मिळाला आहे, अशी बाजू मुलगा घेऊ शकत नाही, मुलगा काहीही म्हणू शकत नाही. जर वडिलांनी मालमत्तेबाबत कोणतीही व्यवस्था केली नाही आणि मरण पावले तर मुलीचा तिच्या वडिलांच्या अधिग्रहित मालमत्तेवर स्पष्टपणे हक्क आहे.
जर न्यायालयात असे सिद्ध झाले की, ही संपत्ती त्या व्यक्तीने म्हणजेच तुमच्या वडिलांनी स्वत: मिळवली होती, तर मुलीला मालमत्तेत समान वाटा दिला जातो आणि अशी संपत्ती ही मुलीला मिळालेली संपत्ती मानली जाते.
मुस्लिमांच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे, इथे मुलीला मुलापेक्षा थोडे कमी अधिकार आहेत, परंतु आजकाल न्यायालय ही संकल्पना स्वीकारत नाही आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्याच्या बाबतीतही भारताचा कायदा समान आहे. भारतीय उत्तराधिकार कायदा लागू करून मुलीला हक्क प्रदान केले जातात. वडिलांनी मिळवलेल्या मालमत्तेत मुलगी मुस्लिम असली तरी तिला समान वारसा मिळतो.
वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत, परिस्थिती थोडी वेगळी आहे. वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता. मुलींचे लग्न दुसऱ्या ठिकाणी होते, अशा परिस्थितीत त्यांचे हक्क फार कमी असताता.
या प्रकरणातील कायदा अत्यंत तपशीलवार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत एक ते दोन पिढ्यांनंतर मुलींचे हक्क जवळजवळ कमी होत जातात. परंतु 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यात काही बदल करण्यात आले आणि आता वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीला मुलांइतकाच हक्क मिळत आहे. मग त्या मुलीचं कधीही लग्न झालेलं असो, कोणाशाही झालेलं असो. तिचा अधिकार तुम्ही नाकारु शकत नाही.
1. जर एखाद्या मुलीने तिच्या वारसा हक्काचा त्याग केला तर तिला मालमत्तेत कोणताही हक्क मिळत नाही. मग ही मालमत्ता तिच्या वडिलांची स्वकष्टार्जित मालमत्ता असो किंवा वडिलांची स्वतंत्रपणे मिळवलेली मालमत्ता असो. जर मुलीने तिचा वाटा सोडला असेल आणि रिलीझ डीडवर तिची स्वाक्षरी असेल आणि त्या कागदपत्राची नोंद झाली असेल. तर त्यावर मुलीचा कोणताही अधिकार उरणार नाही.
2. जर वडिलांनी स्वत: मिळवलेल्या मालमत्तेला मृत्युपत्रात मुलाच्या नावे लिहून मुलींना पूर्णपणे नाकारले असेल, आणि या मृत्युपत्राची नोंद झाली असेल, तर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींना मालमत्तेत कोणताही अधिकार मिळत नाही. मग ती कोर्टात जाऊन त्यांच्या मालमत्तेबाबत कोणताही हक्क मागू शकत नाहीत कारण वडिलांनी तिला त्यामधून बेदखल केलं आहे.
परंतु हे लक्षात घ्या की, वडील स्वत: घेतलेली मालमत्तेच मृत्युपत्र करू शकतात. परंतु ते वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात कोणतेही मृत्युपत्र करू शकत नाही ती व्यक्ती आपल्या मुलीचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही.