Swati Maliwal Sexually Assaulted: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलीवाल (Delhi Commission of Women chief Swati Maliwal) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. माझे वडीलच माझ्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assualt) करायचे अशी माहिती त्यांनी दिली आहे. आपण लहान असताना वडील लैंगिक अत्याचार करायचे असं स्वाती मलीवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली महिला आयोगाकडून आयोजित कार्यक्रमात 100 महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वाती मलीवाल यांना आपल्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. एक वेळ होती, जेव्हा आपण भीतीपोटी बेडच्या खाली लपत होते अशी माहिती त्यांनी दिली.
"मी लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. होते. ते मला नेहमी मारहाण करत होते. ते घरी आले की मला भीती वाटायची. भीतीपोटी मी बेडच्या खाली लपायचे. लहान असल्याने मी महिला आणि मुलांवर अत्याचार करणाऱ्या अशा पुरुषांना कसा धडा शिकवायचा आणि महिलांना त्यांचे हक्क कसे मिळवून द्यायचे याबद्दल नेहमी योजना आखत असे," अशी माहिती स्वाती मलीवाल यांनी दिली आहे.
#WATCH | "I was sexually assaulted by my father when I was a child. He used to beat me up, I used to hide under the bed," DCW chief Swati Maliwal expresses her ordeal alleging her father sexually assaulted her during childhood pic.twitter.com/GsUqKDh2w8
— ANI (@ANI) March 11, 2023
वडील आपले केस पकडून भिंतीवर डोकं आपटायचे. यामुळे आपण अनेकदा जखमी झाले होतो. रक्त वाहत असायचं. मी चौथीत जाईपर्यंत अनेकदा असे प्रकार झाले. यानंतर आम्ही त्यांना सोडून दिलं असाही खुलासा त्यांनी केला.
"जेव्हा एखादी व्यक्ती खूप अत्याचार सहन करते तेव्हाच त्याला दुसऱ्याचं दु:ख समजतं. त्याच्यामध्ये अशी एक आग पेटते की तो संपूर्ण सिस्टीम हलवून टाकतो. माझ्यासोबतही असंच झालं. आम्ही ज्यांचा सत्कार केला त्यांचीही अशीच कहाणी आहे. संघर्ष करत आयुष्य जगावं आणि सकारात्मकपणे वाटचाल कशी करावी हे त्यांनी शिकवलं आहे," असं स्वाती मलीवाल यांनी सांगितलं आहे.
दरम्यान याआधी दिल्लीत एका जपानी महिलेशी होळीच्या निमित्ताने असभ्य वर्तन करण्यात आल्याच्या घटनेवर स्वाती मलीवाल यांनी संताप व्यक्त केला होता. एका जपानी महिलेला तरुणांनी घेरत रंग लावण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्दतीने स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्वाती मलीवाल यांनी ट्वीट करत हा व्हिडीओ पाहून आपलं रक्त सळसळत असल्याचं म्हटलं होतं.
जितनी बार ये वीडियो देख रही हूँ, उतनी बार खून खौल रहा है। चाहे कुछ हो जाए इनमें से किसी को नहीं छोड़ूँगी, हम सुनिश्चित करेंगे इनमें से एक एक लफ़ंगा सलाख़ों के पीछे पहुँचेगा। pic.twitter.com/ckDKrYry6B
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) March 10, 2023
काही झालं तरी यांच्यातील कोणाला सोडणार नाही. सर्व लफंगे जेलमध्ये असतील याची खात्री करु असं आश्वासनही त्यांनी ट्विट करत दिलं होतं.