पप्पा, मी अजून जिवंत...; अत्यंविधी सुरू असतानाच लेकीचा व्हिडीओ कॉल, भलतेच सत्य समोर

Trending News In Marathi: मुलगी महिन्याभरापासून बेपत्ता होती. अचानक एक मृतदेह सापडला घरच्यांनी तिच समजून अत्यंविधीची तयारी सुरु ठेवली. पण नंतर समजलं भलतंच सत्य.  

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 21, 2023, 11:40 AM IST
पप्पा, मी अजून जिवंत...; अत्यंविधी सुरू असतानाच लेकीचा व्हिडीओ कॉल, भलतेच सत्य समोर title=
dead declared daughter called her father and said i am alive trending news in marathi

Crime News In Marathi: मुलीच्या अत्यंविधीची तयारी सुरू होती. संपूर्ण कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. मुलीला अग्नी देणार की तितक्यात मुलीचाच व्हिडिओ कॉल आला. बाबा मी अजून जिवंत आहे, माझा मृत्यू झाला नाहीये, ही वाक्य ऐकून कुटुंबीयांना एकच आनंद झाला आहे. गेल्या एक महिन्यांपासून त्यांची मुलगी बेपत्ता होती. त्यादरम्यान त्यांना एक अज्ञात मृतदेह सापडला. कपड्यांवरुन घरच्यांनी तिच्या मृतदेहाची ओळख पटवली. मात्र, मुलीचे अत्यंविधी सुरू असतानाच मुलीचा ती सुखरुप असल्याचा फोन आला. 

बिहार राज्यातील पूर्णिया येथील अकबरपुर क्षेत्रातील आहे. इथे राहणारी अंशु कुमारी ही एक महिन्यांपूर्वी अचानक रहस्यमयरित्या गायब झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र ती कुठेच सापडली नाही. त्याचदरम्यान मागील आठवड्यात एका मुलीचा मृतदेह नाल्यात सापडला होता. त्या मृतदेहाच्या कपड्यांवरुन तो अंशुचाच असल्याची ओळख पटवण्यात आली. चेहरा विद्रुप झाल्याने तो ओळखणे अवघड बनले होते. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर वडिल इतके धक्क्यात होते की त्यांना अत्यंसस्कार करण्याचेही भान नव्हते. अखेर मुलीच्या आजोबांनी पुढाकार घेत अत्यंविधीची तयारी केली. 

अत्यंविधीची तयारी सुरू असतानाच वडिलांच्या मोबाइलवर एक व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉलवर मुलीला पाहून वडिल आश्चर्यचकित झाले. वडिलांना पाहताच तिने मी अजून जिवंत असून सुखरुप असल्याचे सांगितले. मुलीला पाहून शोककळा पसरलेल्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण पसरले. इतकंच नव्हे तर अंशुने ती सध्या कुठे आहे आणि इतके दिवस त्यांच्यापासून का लांब होती याचे कारणही धीर एकटवून सांगितले आहे. 

खरंतर अंशु तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून गेले आहे. सध्या ती पूर्णियातीलच एका बनमनखी ब्लॉक परिसरात तिच्या सासरी राहत आहे. अकबरपूरच्या SHO यांनी म्हटल्याप्रमाणे सूरज प्रसाद यांनी म्हटलं आहे की, जेव्हा मला घटनेबाबत कळले तेव्हा मी खरं खोट तपासण्यासाठी मुलीच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला तेव्हा तीने सांगितले की ती सध्या तिच्या सासरी असून सुखरुप आहे.

दरम्यान, अंशु सुखरुप असल्याची माहिती कळल्यावर एक प्रश्न अनुत्तरीत राहतो. ते म्हणजे ज्या मुलीचा मृतदेह सापडला ती कोण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाहीये. प्रेम प्रकरणातूनच हत्या झाली असावी, असा संशय आहे. मुलीच्या घरात पोलिसांनी धाड मारली होती मात्र ते सध्या फरार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.