६ वर्षाच्या मृत मुलाला कवटाळून आईचा जीवघेणा हंबरडा...आणि नियतीनेही मागे वळून पाहिलं...

नियती एवढी क्रूरही होत नाही, ती देखील कुणाचा तरी विचार करत असावी, नियतीलाही कधी तरी मागे फिरुन पाहावंस वाटतं की काय, अशीच ही घटना घडली असं म्हणावं लागेल...

Updated: Jun 18, 2021, 09:21 PM IST
६ वर्षाच्या मृत मुलाला कवटाळून आईचा जीवघेणा हंबरडा...आणि नियतीनेही मागे वळून पाहिलं... title=

रोहतक :  देशभरात कोरोनामुळे अतिशय मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडत आहेत... कोरोनात लहान मुलं गेल्याची बातमी आता कानावर येऊ नये असं वाटतं. कारण अशी बातमी ऐकताना हातपाय आता थरथरतात. पण महामारी किती भयानक असते ही पाहणारी आपली पहिलीच पिढी आहे, कारण कॉलरा आणि प्लेग प्रत्यक्षात पाहणारी पिढी आता जिवंत राहिलेली नाही. आता यातही काही घटना अशा घडतात की खूप मोठा दिलासा देऊन जातात. नैसर्गिक आपत्तीत सर्वच काही वाईट होत नाही. नियती एवढी क्रूरही होत नाही, ती देखील कुणाचा तरी विचार करत असावी, नियतीलाही कधी तरी मागे फिरुन पाहावंस वाटतं की काय, अशीच ही घटना घडली असं म्हणावं लागेल...

हरियाणातील ६ वर्षाचा मुलगा मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगून टाकलं. मोठ्या जड अंतकरणाने लहानग्याच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली. ती आई आणि मुलाची शेवटची न पाहावी आणि न पाहिली जाणारी भेट जवळच्यांना अखेर पाहावीच लागली. जे झालं ते अतिशय वाईट, तरी देखील आईची समजूत घालावी लागली.

पण आई शेवटच्या क्षणी ६ वर्षाच्या मुलाला छातीशी कवटाळून बसली, ती मृतदेह सोडता सोडत नव्हती, ती सारखी त्याला उठवत होती, बाळा उठ ना...उठ असा प्रचंड आक्रोश होत होता.

हा आक्रोश नातेवाईकांकडून पाहिला जात नव्हता, म्हणून आईने मुलाला कवटाळलेली मिठी सोडण्याचा निर्दयीपणा कुणी तरी करावा म्हणून एकमेकांकडे पाहिलं जात होतं, कारण त्या माऊलीचा मुलासाठीचा आक्रोश पाहिला जात नव्हता.

मुलाला उठवण्यासाठी तिच्या किंकाळ्या, विनवण्या सर्वांना हेलावून टाकत होत्या, आई म्हणत होती की माझा मुलगा गेला नाही तो जिवंत आहे, तसं तिला भासतं होतं, हालचाल जाणवत होती...पण कुणीही विश्वास ठेवत नव्हतं.

अखेर मुलाच्या वडिलांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, गुंडाळलेलं कापड बाजूला केलं. काहीशी धग जाणवत होती, मुलाला वडिलांनी तोंडाने श्वास दिला, एकाने छाती दाबण्यास सुरुवात केली.

तोंडाने श्वास देणाऱ्या वडिलांचे ओठ त्या मुलाने दाताने पकडले, त्याला पुन्हा रोहतकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. याआधी फक्त मुलाचे वाचण्याचे १५ टक्के चान्स आहेत, मुलगा दगावला आहे, असं सांगण्यात आलं होतं. 

यानंतर या मुलावर यशस्वी उपचार करण्यात आले, आणखी २० दिवस उपचार करण्यात गेले, पण यानंतर हा मुलगा आज जिवंत आहे, हसतोय खेळतोय. तिच्या आईचा आक्रोश पाहून गावातील अनेकांना वाटलं होतं की, देवाने याला आता तरी जिवंत करावं, असं स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्नही पूर्ण झाल्याने सर्वांना आनंद झाला आहे.