अमित भिडे, झी मीडिया, मुंबई : दक्षिण भारतात चेन्नईत संरक्षण उत्पादनांचा कुंभमेळा भरलाय... इथं 'डीफेन्स एक्स्पो 2018'ची सुरूवात झालीय. 'मेक इन इंडिया'च्या सिंहाची घोडदौड इथे पाहायला मिळतेय. संरक्षण मंत्रालयाच्या आकड्यांनुसार 670 संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. त्यात 154 परदेशी कंपन्यांनी आपली स्टॉल्स इथे लावले आहेत.
जगातला सर्वात मोठा आयातदार ही भारताची प्रतिमा बदलून संरक्षण निर्यातदार म्हणून या देशाला सादर करण्याचा एनडीए सरकारचा मोठा प्रयत्न या प्रदर्शनातून दिसून येतो. आगामी वर्षभरात भारत 300 कोटींची आयात या क्षेत्रात करेल, असा अंदाज आहे... त्यामुळे यातली काही ना काही हिस्सा आपल्याला मिळावा यासाठी जगातल्या सर्वच महत्त्वाच्या कंपन्या इथे डोळा ठेऊन आहेत. मंगळवारी या डिफेन्स एक्स्पोची सुरूवात झाली असली तरी याचं खऱ्या अर्थाने बुधवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.
'तेजस' या विमानाचा या प्रदर्शनात मोठा बोलबाला आहे... कल्याणी ग्रुप आणि डीआरडीओच्या संयुक्त विद्यमाने निर्माण केलेली अॅडव्हान्स डोट आर्टिलरी गन सिस्टीम म्हणजे अटॅग्ज, अर्जुन मार्क टू रनगाडा, 11 मिमीची धनुष आर्टीलरी गन या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य आहे. डीआरडीओची निर्भय मिसाईल सिस्टीम, ड्रायव्हररहीत स्वयंचलित कार, अॅस्ट्रा मिसाईल, आणि वरूणास्त्र म्हणजे हेवी वेट पाणबुडी विरहीत इलेक्ट्रीक टॉरपेडो ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्य आहेत.
अमेरिका, युके, रशिया, अफगाणिस्तान, स्वीडन, फिनलंड, इटली, मादागास्कर, म्यानमार, नेपाळ, पोर्तुगाल, सेशेल्स, व्हीएटनामसह 47 देशांचं प्रतिनिधी मंडळही या डिफेन्स एक्स्पोमध्ये सहभागी आहे यावरून या प्रदर्शनाकडे जग कोणत्या दृष्टीने पाहतंय, हे लक्षात येईल.