आताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे (ED) अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. 

राजीव कासले | Updated: Mar 21, 2024, 09:49 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक title=

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे (ED) अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ईडीच्या सात ते आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडक मारली.  दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने सध्या नकार दिला होता. 

8 ते 10 अधिकाऱ्यांचं पथक
ईडीच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिल्ली पोलीस दलातील बडे अधिकारीही मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर उपस्थित होते. याआधी ईडने अरविंद केजरीवाल यांना तब्बल 9 समन्स दिले होते. गुरुवारी त्यांना दहावा समन्स देण्यात आला. 

कोर्टात काय झाल?
दिल्ली हायकोर्टात अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला.  केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने सध्या नकार दिला. समन्स दिल्यानंतर एकदाही अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नव्हते. चौकशीसाठी गेल्यानंतर अटक होणार नाही याची केजरीवाल यांना कोर्टाकडून शाश्वती हवी होती. यावर कोर्टाने ईडीसमोर चौकशीसाठी हजर व्हावंच लागेल असे आदेश दिले. तसंच अटकेला स्थगिती देण्यासही नकार दिला.

जेलमधून चालणार दिल्ली सरकार
अरविंद केजरीवालय यांना अटक करण्यात आलं असलं तरी तेच दिल्ली सरकार चालवतील असं आम आदमी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आप नेता आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील योजनांची माहिती दिली. आपमधल्या सर्वांना जेलमध्ये टाकलं तर जेलमधून सरकार चालवू असं भारद्वाज यांनी म्हटलं आहे. जो विरोध करेल त्याला जेलमध्ये टाकायची हीच भाजपची निती आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. दिल्लीत सुरु करण्यात आलेल्या मोफत शिक्षण, मोफत वीज, मोफत पाणी, रुग्णालय, मोहल्ला क्लिनिक या सुविधा बंद व्हाव्यात असं भाजपाला वाटतं, पण काही झालं तरी अरविंद केजरीवाल ते होऊ देणार नाहीत असंही भारद्वाज यांनी सांगितलं आहे. 

काय आहे मद्यविक्री घोटाळा?
दिल्लीचे उत्पादन शुल्कमंत्री या नात्याने मनीष सिसोदिया यांनी आपल्या अखत्यारीत मनमानी पद्धतीने आणि एकतर्फी निर्णय घेतले असा त्यांच्यावर आरोप आहे. 'आप'चे दिल्ली सरकार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मद्य व्यवसायातील मालक आणि दुकानदार यांच्याकडून 'किकबॅक' आणि 'कमिशन'च्या बदल्यात पैसे घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कमिशनच्या बदल्यात मद्यविक्री परवानाधारकांना अनुचित लाभ देण्यात आला. तसंच करोना महामारीच्या काळात मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांवरील दंड माफ करून, त्यांना दिलासा देण्यात आल्याचा आरोपही आहे. या गैरव्यवहारातून जे पैसे मिळाले, ते गोवा आणि पंजाब राज्यात 2022 साली झालेल्या निवडणुकीत वापरण्यात आल्याचंही बोललं जातंय.