नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा मृत्यूमुखी पडले होते. त्यांच्य परिवाराला सहाय्य म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. ते. सेच त्यांच्या परिवारातील एका सदस्याला दिल्ली सरकारतर्फे नोकरी देण्यात येणार आहे.
२६ वर्षीय अंकित शर्मा यांच्या मृतदेहावर ४०० हून अधिक चाकूचे वार करण्यात आले होते. ज्यानंतर त्यांचा मृतदेह गुरु तेग बहाद्दर रुग्णालयात नेण्यात आला. आम आदमी पार्टीच्या ताहिर हुसेनच्या समर्थकांनी ही हत्या केल्याचा आरोप अंकित यांच्या घरच्यांनी केला होता. पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी आपल्या एक महिन्याचा पगार अंकित शर्माच्या घरच्यांना देण्याची घोषणा केली आहे.
गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या शर्मा यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंकित शर्मा घरी परतले. परिस्थितीविषयी माहिती मिळताच लगेचच ते घराबाहेरही पडले. पण, त्यानंतर त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही. बराच वेळ होऊनही त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरु केली. त्यांनी रुग्णालयातही धाव घेतली पण, तिथेही त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळू शकली नाही, अशी माहिती 'आऊटलूक'ने प्रसिद्ध केली.
बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारासही त्यांचा शोध सुरुच होता. पुढे सकाळी १० वाजता चाँदबाग नाल्यात त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ माजली. त्याला कोणी असं मारेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं. नशिब आपल्याशी इतकी वाईट खेळी खेळेल याची कल्पनाही नसल्याचं म्हणत शर्मा यांच्या आईने दु:ख व्यक्त केलं