दिल्ली हायकोर्टाने अमेरिकन व्यक्तीला दिली अनोखी शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण

सध्या सोशल मीडियावर दिल्ली हायकोर्टाने एका आरोपीला दिलेल्या शिक्षेची चर्चा होत आहे. 

Updated: Jul 31, 2022, 04:12 PM IST
दिल्ली हायकोर्टाने अमेरिकन व्यक्तीला दिली अनोखी शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण title=

Trending News: सोशल मीडियामुळे देशातील कानाकोपऱ्यातून अनेक घटना, गोष्टी या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. सध्या सोशल मीडियावर दिल्ली हायकोर्टाने एका आरोपीला दिलेल्या शिक्षेची चर्चा होत आहे. दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या अमेरिकन व्यक्तीला दिल्ली हायकोर्टाने अनोखी शिक्षा दिली आहे. 

काय आहे प्रकरण?

दिल्ली विमानतळावरुन पोलिसांनी एका अमेरिकन व्यक्तीला अटक केली. हा व्यक्ती दिल्लीहून शिकागोला जात होता. विमानतळावरील तपासणीत या व्यक्तीजवळ काडतुसे सापडली. कोणतीही वैध कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी काडतुसे जप्त केली आणि त्या व्यक्तीला अटक केली. 

दिल्ली पोलिसांनी या व्यक्तीविरोधात शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल केली. दिल्ली पोलिसांनी या व्यक्तीला दिल्ली हायकोर्टात हजर केलं. त्यावेळी या आरोपीने आपली बाजू मांडली. चुकून एक काडतूस आपल्याजवळ राहिल्याचं त्याने कोर्टात कबुली दिली. आरोपीचा जबाव ऐकल्यावर दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी या आरोपीला अनोखी शिक्षा दिली. न्यायमूर्ती आपल्या आदेशात म्हणाले की, अमेरिकन व्यक्तीच्या चुकीमुळे दिल्ली पोलिसांचा बहुमोल वेळ वाया गेला. त्यामुळे त्यांनी आता समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, असं हायकोर्टाचं मत होतं. त्यासोबत त्या व्यक्तीविरोधातील FIR हायकोर्टाने रद्द केली.

काय आहे अनोखी शिक्षा?

दिल्ली हायकोर्टाने अमेरिकन व्यक्ती किमान 200 विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मॉस्किटो रिपेलेंटचे वाटप करण्याची शिक्षा दिली आहे. त्यासोबत हे 200 विद्यार्थी सरकारी किंवा महापालिका शाळेतील असाला पाहिजे, असंही कोर्टाने सांगितलं आहे. तसंच तपास अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन सरकारी वकिलांकडून शाळेबद्दल माहिती काढली जाईल. त्यानंतर आठवड्याभरात या साहित्याचं वाटप केलं जावं, असं कोर्टाने आदेश दिली आहे.