भाजप नेते परवेश वर्मा यांना प्रचार करण्यास दुसऱ्यांदा बंदी

भाजप खासदार परवेश वर्मा यांना प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा बंदी घातली आहे.  

Updated: Feb 5, 2020, 11:00 PM IST
भाजप नेते परवेश वर्मा यांना प्रचार करण्यास दुसऱ्यांदा बंदी  title=
Pic Courtesy: ANI

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दिल्लीत सत्ताधारी 'आप' शह देण्यासाठी भाजपला आक्रमकपण धारण करावा लागला आहे. मात्र, हा आक्रमकपणा भाजपलाच भोवला आहे. भाजप खासदार परवेश वर्मा यांना प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा बंदी घातली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हणणे वर्मा यांना भोवले आहे. 

निवडणूक आयोगाने प्रचार करण्यास त्यांच्यावर २४ तासांची बंदी घातली आहे. याआधी गेल्याच आठवड्यात निवडणूक आयोगानं वर्मा यांना प्रचार करण्यास ९६ तासांची बंदी घातली होती. निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या भाजपच्या  नेत्यांवर प्रचारबंदीची कारवाई केली होती. यात केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर ७२ तासांची, तर पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांच्यावर ९६ तासांची बंदी घातली होती. तरीही पुन्हा वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. त्यांनी त्यांना दहशतवादीच म्हटले. 

दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांना दहशतवादी असे संबोधणारे भाजप खासदार परवेश वर्मा यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती. त्यांना या नोटीसीचे उत्तर देण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणूक प्रचारात धर्माच्या नावावर द्वेष निर्माण केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ठाकूर आणि वर्मा यांची नावे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून हटविण्याचे आदेश बुधवारी दिले होते.

दिल्लीतील नागरिक माझ्याकडे त्यांचा मुलगा म्हणून पाहतात, भाऊ म्हणून की एक दहशतवादी म्हणून हे विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून सिद्धच होईल, अशा शब्दांत  मुख्यमंत्री  केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. भाजपच्या नेत्यांनी केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला होता.