Delhi UPSC Aspirants Deaths: दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगर येथे तळघरात चालवल्या जाणाऱ्या राऊ सिव्हिल सर्व्हिस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये भरलेल्या पाण्यात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाण्यातून भरधाव वेगात गाडी नेणाऱ्या एका चालकाचाही समावेश आहे. त्याने पाण्यातून गाडी नेल्याने ते पाणी गेट तोडून बेसमेंटमध्ये शिरलं असा आरोप आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यांची ओळख उघड केलेली नाही.
दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे साचलेलं पाणी युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये शिरलं. हे कोचिंग सेंटर बेसमेंटमध्ये सुरु असल्याने हे विद्यार्थी पाण्यात अडकले होते. यावेळी आयएएस होण्याची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिकपणे यामध्ये राव आयएएस स्टडी सर्कलचा मालक आणि दिल्ली पालिकेचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. याचं कारण बेसमेंटला स्टोअर रुम सांगत तिथे ग्रंथालय चालवलं जात होतं.
पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बेसमेंटचा गेट बंद होता. पण पावसाचं पाणी वेगाने आल्याने गेट कोलमडला. यादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो वेगळं चित्र समोर आणत आहे.
A video footage has come to the fore showing a car moving fast on the waterlogged road in Delhi's Old Rajendra Nagar. Due to this incident, the gate of the building broke and water started to fill the basement of the RAU IAS coaching center. Three students lost their lives by… pic.twitter.com/2uWCJH5r4x
— Syed Hassan Kazim سید حسن کاظم (@iamshk92110) July 28, 2024
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो कोचिंग सेंटरच्या समोरुन शूट करण्यात आला आहे. व्हिडीओत रस्त्यावर कमरेइतकं पाणी भरलेलं दिसत आहे. याचदरम्यान एक एसयुव्ही या पाण्यातून वेगाने जाते. एसयुव्ही गेल्यानंतर पाण्याची एक मोठी लाट तयार होते आणि ती जाऊन बेसमेंटच्या गेटवर आदळते. लाट आदळल्यानंतर गेट कोसळतो, आणि पाणी वेगाने आत शिरतं.
प्राथमिक पोलिस तपासात असे दिसून आले की कोचिंग इन्स्टिट्यूट तळघर परिसरात लायब्ररी बेकायदेशीरपणे चालवत होतं. बीएनएसच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यात दोषी मनुष्यवधाचा समावेश आहे आणि रविवारी संस्थेच्या समन्वयकासह आरोपी मालकाला अटक करण्यात आली.
पोलिसांनी घटनाक्रम उलगडून पाहिलं असता यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्यांमध्ये एसयुव्हीदेखील असल्याचं समोर आलं. डीसीपी (सेंट्रल) एम हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे की, "पावसाच्या पाण्यातून गेलेली ही कार कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये पूर येण्यास कारणीभूत ठरल्याचा संशय आहे. त्यामुळे कार चालकाला अटक करण्यात आली आहे. या एसयूव्हीचा मालक स्वतंत्र व्यक्ती असल्याचेही समोर आलं आहे. त्याचा संस्था किंवा तिच्या मालकांशी कोणाचाही संबंध नाही".